सध्या करीना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेननचा चित्रपट 'क्रू' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. बॉलिवूडच्या तीन सुंदर अभिनेत्रींचा दमदार अभिनय असलेल्या या चित्रपटाने तिकीट खिडकीवर स्वतःची चांगली पकड निर्माण केली आहे. प्रेक्षकांनाही हा चित्रपट आवडला आहे. सध्या हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई करत आहे. दररोज कोट्यवधींचा गल्ला जमवणाऱ्या या चित्रपटात काम करण्यासाठी करीना कपूर खानसह इतर कलाकारांना किती मानधन मिळाले? तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून घेऊया...
मीडिया रिपोर्ट्सनुसार बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान हिने 'क्रू' या चित्रपटासाठी सर्वाधिक फी आकारली आहे. अभिनेत्रीला 'क्रू' चित्रपटासाठी तब्बल १० कोटी रुपयांची मोठी रक्कम देण्यात आली आहे, जी तिच्या आधी रिलीज झालेल्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटातील मानधनापेक्षा जास्त आहे. 'लाल सिंह चड्ढा' या चित्रपटासाठी करीना कपूर-खानला ८ कोटी रुपये मिळाले होते.
त्याचबरोबर क्रिती आणि तब्बू यांना 'क्रू' चित्रपटासाठी ३ ते ४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. क्रितीला तिचा शेवटचा थिएटर रिलीज चित्रपट 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' साठी ५ ते ५ कोटी रुपये फी मिळाली होती. तर, तब्बूने तिच्या आधीच्या थिएटर रिलीजसाठी म्हणजेच 'भोला' चित्रपटासाठी ४ कोटी रुपये मानधन घेतले होते.
याशिवाय या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा यांनी स्पोर्टिंग लीड ॲक्टर्सची भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी दिलजीत दोसांझ याला ३ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर, कपिल शर्माला या चित्रपटासाठी ५० लाख रुपये देण्यात आले आहेत. या चित्रपटातील कलाकारांच्या मानधनाचे हे सर्व आकडे केवळ मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहेत. प्रत्यक्षात यात काही तफावत देखील असून शकते. या सगळ्या दरम्यान 'क्रू' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. अवघ्या चार दिवसांत या चित्रपटाने ३४ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला टक्कर देण्यासाठी अनेक चित्रपट आले आहेत. मात्र, तरीही 'क्रू' चित्रपट चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.