Kareena Kapoor on Amrita Singh: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने अभिनेत्री अमृता सिंहसोबत पहिले लग्न केले होते. दोघांचा हा प्रेमविवाह होता. मात्र, तो फार काळ टिकू शकला नाही. लग्नाच्या काही वर्षांनंतर दोघांचा घटस्फोट झाला होता. २००४मध्ये सैफ आणि अमृता एकमेकांपासून वेगळे झाले. यानंतर सैफ अली खानने बॉलिवूडची ‘बेबो’ अर्थात करीना कपूरसोबत कोर्ट मॅरेज केले. आजघडीला अभिनेता सारा, इब्राहिम, तैमुर आणि जहांगीर अशा चार मुलांचा बाप आहे. करीना आणि अमृता या दोघी सवती असल्या तरी यांच्या नात्याबद्दल बोलायचे झाले, तर त्या दोघी कधीच एकमेकींना भेटलेल्या नाहीत. पण, जुन्या मुलाखतींमध्ये दोघांनी एकमेकींबद्दल फक्त चांगल्याच गोष्टी बोलल्या आहेत. एका मॅगझिनशी बोलताना बेबोने आपण साराच्या आईची म्हणजेच अमृता सिंहची फॅन असल्याचे म्हटले होते.
२००८मध्ये 'पीपल मॅगझीन'शी झालेल्या खास संवादात करीना कपूरने स्वत:ला अमृता सिंहची फॅन असल्याचे म्हटले होते. यात तिने असेही म्हटले होते की, सैफने आपल्या माजी पत्नीशी मैत्रीपूर्ण सबंध ठेवावेत, अशी तिची इच्छा आहे. या मुलाखतीत जेव्हा बेबोला विचारण्यात आले की, सैफ अली खान आणि तिच्यात त्यांच्या जुन्या नात्यांबद्दल चर्चा झाली आहे का? तेव्हा करीना म्हणाली होती की, 'मी या गोष्टीचा आदर करते की, सैफचे यापूर्वीही एक लग्न झाले होते आणि त्याला दोन सुंदर मुले आहेत. मी स्वतः अमृता सिंहची चाहती आहे.’
या मुलाखतीत करीना कपूर पुढे म्हणाली, 'मी अमृता सिंहला कधीच भेटले नाही. पण, मी तिला तिच्या चित्रपटांमधून ओळखते. माझ्यासाठी, सैफच्या आयुष्यात तिचे नेहमीच महत्त्वाचे स्थान असेल. कारण ती त्याची पहिली पत्नी आणि त्याच्या मुलांची आई आहे. आणि हे मी सैफलाही सांगितले आहे. तिला नेहमीच हा सन्मान मिळावा अशी माझी इच्छा आहे. माझ्या आई-वडिलांनी मला हेच शिकवलं आहे.’
करीना पुढे म्हणाली, 'काहीही झालेले असो, पण त्यांचे लग्न झाले होते. त्यांचे लग्न यशस्वी झाले नाही. पण, मी नेहमीच सैफला तिच्याशी मैत्री करण्यास सांगितले आहे. कारण मला वाटते की, हेच योग्य आहे. मला वाटतं दोघांनाही सध्या वेळ हवा आहे. पण काही गोष्टी आहेत ज्यांना त्यांना सामोरे जावे लागेल. मी अमृताचा नेहमीच आदर करेन.’