टीव्ही अभिनेता करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची पहिली भेट रिॲलिटी टीव्ही शो 'बिग बॉस १५' मध्ये झाली होती. या शो दरम्यानच दोघे प्रेमात पडले. ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडल्यानंतरही त्यांचे नाते कायम आहे आणि या जोडीला लोकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे. सोशल मीडियावर दररोज पापाराझी आणि चाहते या जोडीला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारत असतात. त्यांचे नाते अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा सुरू आहेत. यावर आता अखेर करण कुंद्रा याने उत्तर दिले आहे.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्या ब्रेकअपच्या चर्चेदरम्यान, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, अभिनेत्याने असे काही सांगितले, ज्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, करण कुंद्रा आणि त्याची 'लव्ह अधुरा'मधील सहकलाकार एरिका फर्नांडिस यांना एकमेकांसाठी मॅट्रिमोनी प्रोफाइल लिहिण्यास सांगण्यात आले होते. यावेळी एरिकाने करणची मस्करी करताना म्हटले की, करणला कधीच लग्न करायचे नव्हते. याला प्रत्युत्तर देताना करण कुंद्रा म्हणाला की, काळ बदलायला वेळ लागत नाही.
करण कुंद्रा म्हणाला की, माझी मुलाखत या शोच्या ट्रेलरइतकीच दिशाभूल करणारी आहे. तेजस्वी प्रकाशसोबतचे ब्रेकअप किंवा लग्नाबाबत चर्चा आणि त्याला विचारण्यात आलेले प्रश्न यामुळे त्रास होतो का? या प्रश्नाचे उत्तरही करण कुंद्राने दिले. अभिनेता म्हणाला, ‘एक कपल म्हणून आमच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत, आणि काही लोकांना वाटते की, आम्ही एकत्र नाही. या गोष्टींचा आता मला फार त्रास होत नाही. कारण, आम्ही रोज एकत्र बसतो, चर्चा करतो. गप्पा मारतो. आणि तरीही लोक म्हणतात की, आमचे ब्रेकअप झाले आहे किंवा तेजस्वीचे लग्न दुसऱ्या कुणासोबततरी झाले आहे, हे किती बाष्कळ आहे. काही लोक खरंच खूप रिकामटेकडे असतात.’
लग्नाच्या प्रश्नावर उत्तर देताना अभिनेत्याने त्याच्या 'अब तेरा क्या होगा लवली' शोचा विषय काढून म्हटलं की, ‘मला वाटते अब तेरा क्या होगा लवलीचा सीक्वल येईल. त्यानंतरच गुगुचे लग्न होईल.’ त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न केला पण, पुन्हा विचारले असता अभिनेता म्हणाला की, ‘सध्यातरी मला माहित नाही. पण माझ्यासोबत अचानक काही गोष्टी घडतात. मी प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करतो. जसे सर्वजण माझ्या लग्नासाठी प्रार्थना करत आहात, तशीच माझ्या करिअरसाठीही प्रार्थना करा.’
संबंधित बातम्या