Upasana Singh On Casting Couch : ‘द कपिल शर्मा शो’मध्ये कपिल शर्माची ‘बुआ’ म्हणून घराघरांत प्रसिद्ध झालेल्या उपासना सिंहने बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. उपासनाने तिच्या करिअरमध्ये अनेक लक्षात राहतील अशा भूमिका केल्या आहेत. मात्र, या दरम्यान तिला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. तिने नुकताच तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला. वडिलांच्या वयाच्या एका दिग्दर्शकाने तिला हॉटेलमध्ये बोलावले आणि मग असे काही बोलला की, दुसऱ्या दिवशी चिडलेली उपासना त्याच्या ऑफिसमध्ये गेली आणि सर्वांसमोर त्याचा अपमान केला.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत उपासना म्हणाली की, ‘एका बड्या दाक्षिणात्य दिग्दर्शकाने मला अनिल कपूरसोबत एका चित्रपटात साइन केले होते. जेव्हा जेव्हा मी त्या दिग्दर्शकाला भेटायला जायचे, तेव्हा आई आणि बहिणीला सोबत घेऊन जायचे. पण, एके दिवशी तो म्हणाला, की तू नेहमी कुणाला तरी सोबत का आणतेस? आणि त्याने मला रात्री साडेअकरा वाजता फोन केला. यावेळी त्याने मला एका हॉटेलमध्ये सिटींगसाठी बोलावले. मी म्हणाता, की सिटींगसाठी उद्या येईन, कारण खूप उशीर झाला होता आणि माझ्याकडे गाडी नव्हती. त्यावर तो म्हणाला की, नाही तुला माझ्या सिटींगचा अर्थ कळला नाही का?'
त्याने असे म्हणताच उपासनाला त्याच्या बोलण्याचा अर्थ कळला. त्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही, असे उपासना म्हणाली. ती पुढे म्हणाली की, ‘तेव्हा माझं ‘सरदार’नी मन पेटून उठलं होतं. त्याचं ऑफिस वांद्रे इथं होतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिथे गेले. त्यावेळी त्याची तीन जणांसोबत बैठक सुरू होती. त्याच्या सेक्रेटरीने मला बाहेर थांबण्यास सांगितले, पण मी नकार दिला. मी आत घुसून त्याला पंजाबी भाषेत सर्वांसमोर शिवीगाळ केली. पण, जेव्हा मी ऑफिसमधून बाहेर पडले, तेव्हा मला अनेकांनी सांगितले होते की, मला अनिलसोबत एका चित्रपटात कास्ट करण्यात आले आहे. त्यावेळी मी माझे अश्रू रोखू शकले नाही आणि रडत फुटपाथवर चालत राहिले.’
उपासना पुढे म्हणाली की, ‘मी ७ दिवस माझ्या खोलीतून बाहेर पडले नाही. मी खूप रडत राहिले. पण त्या ७ दिवसांनी मला मजबूत बनवले. माझ्या आईने मला साथ दिली.’ अभिनेत्री उपासना सिंहने ‘जुडवा’, ‘मैं प्रेम की दीवानी हूं’, ‘क्रेझी ४’सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
संबंधित बातम्या