'कांतारा' हा चित्रपट तुफान गाजला होता. या चित्रपटाच्या पुढच्या भागाचे चित्रीकरण सध्या कर्नाटकमध्ये सुरु आहे. या चित्रपटाच्या सेटवरुन एक वाईट बातमी समोर आली आहे. शूटींगच्या सेटवरुन परतणाऱ्या कलाकारांच्या बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ज्युनिअर कलाकारांना दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यामधील एक ज्युनिअर आर्टिस्टची प्रकृती गंभीर असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.
उडुपी जिल्ह्यात कांतारा येथील बस उलटून झालेल्या अपघातात सहा ज्युनिअर आर्टिस्ट जखमी झाल्याची माहिती पीटीआयने दिली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री जडकलजवळ चित्रपटाच्या क्रूला घेऊन जाणारी मिनी बस पलटी झाल्याने हा अपघात झाला.
'जडकलमधील मुदूर येथे चित्रीकरण आटोपून कोल्लूरला परतत असताना ही घटना घडली. मिनी बसमध्ये २० ज्युनिअर आर्टिस्ट होते. त्यांच्या बसचा अपघात झाला आहे, अशी माहिती एका पोलिस अधिकाऱ्याने दिली. जखमींना तातडीने जडकल आणि कुंडापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोल्लूर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गंभीर जखमी झालेल्या सहा ज्युनिअर आर्टिस्टला जडकाळ महालक्ष्मी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे.
"ज्या बातम्या फिरत आहेत त्या पूर्णपणे खोट्या आहेत. कंतारा : चॅप्टर १ च्या टीमने आज सकाळी ६ वाजता चित्रीकरणाला सुरुवात केली आणि सर्व काही सुरळीत सुरू आहे. शूटिंगच्या ठिकाणापासून २० किलोमीटर अंतरावर कांतारा टीमच्या काही सदस्यांना घेऊन जाणाऱ्या लोकल बसला किरकोळ अपघात झाला. मात्र यात कोणतीही जीवितहानी झाली नाही" अशी माहिती चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिली आहे.
कांतारा चॅप्टर १ सिनेमाविषयी
कांतारा चॅप्टर १ हा २०२२मध्ये हिट झालेल्या कांतारा चित्रपटाचा प्रीक्वल आहे. या चित्रपटात अभिनेता ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चित्रीकरणाला सुरुवात झाली होती. २७ नोव्हेंबर २०२३ रोजी फर्स्ट लूक आणि टीझर रिलीज करण्यात आला होता. या महिन्याच्या सुरुवातीला, चित्रपटाचे नवे पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख २ ऑक्टोबर २०२५ जाहीर करण्यात आली. कांतारा : चॅप्टर १ मध्ये ऋषभ शेट्टी, जयराम आणि जिशू सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
वाचा: कोल्हापूरच्या मराठमोळ्या मुलीच्या प्रेमात पडला आर माधवन, जाणून घ्या पत्नीविषयी
सप्टेंबर २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या कांतारा या चित्रपटाने स्थानिक लोककथा आणि परंपरांचा वापर करून किनारपट्टीकर्नाटकमधील मानव विरुद्ध निसर्ग संघर्ष दाखवल्याबद्दल त्याचे कौतुक झाले. अवघ्या १६ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने ४०० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटात शेट्टी दुहेरी भूमिकेत होते आणि सप्तमी गौडा, किशोर आणि अच्युत कुमार यांनी ही भूमिका साकारली होती.