कन्नड चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता दर्शन थुगुडेपा याच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. साऊथच्या या प्रसिद्ध अभिनेत्याला एका खुनाच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आले आहे. बेंगळुरू पोलिसांनी या अभिनेत्यासह अन्य १० जणांना ताब्यात घेतले आहे. चित्रदुर्गातील रेणुका स्वामी नावाच्या व्यक्तीच्या हत्येप्रकरणी आरोपीसोबत अभिनेता दर्शनचा सहभाग समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी त्याची चौकशी करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. चला जाणून घेऊया कोण आहे कन्नड अभिनेता दर्शन थुगुडेपा?
दर्शन थुगुडेपा हा कन्नड चित्रपट उद्योगातील ज्येष्ठ अभिनेते थुगुदीपा श्रीनिवास यांचा मुलगा आहे. दर्शनचा जन्म १६ फेब्रुवारी १९७७ रोजी कर्नाटकात झाला. वडिलांप्रमाणेच दर्शनचेही इंडस्ट्रीत मोठे नाव आहे. त्याने प्रोजेक्शनिस्ट म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. यानंतर त्याने कॅमेरामनची जबाबदारी स्वीकारली होती. या काळात दर्शनने सिनेमॅटोग्राफ गौरीशंकर यांनाही मदत केली. १९९७मध्ये त्याला 'महाभारत' चित्रपटात सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेची ऑफर मिळाली होती. यानंतर या अभिनेत्याने ‘देवरा मागा’ आणि ‘श्री हरिश्चंद्र’सह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्याला खरी ओळख ‘मॅजेस्टिक’ या चित्रपटातून मिळाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता दर्शन थुगुडेपा हत्येच्या प्रकरणात सहभागी असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रदुर्ग येथील रेणुका स्वामी यांच्या हत्येप्रकरणी कारवाई सुरू आहे. वास्तविक, मृत व्यक्ती चित्रदुर्गातील एका मेडिकल दुकानात काम करत होती. काही लोकांनी मिळून रेणुका स्वामीचे अपहरण केले आणि नंतर या व्यक्तीला शहराच्या पश्चिम भागातील कामाक्षीपाल्य येथे नेले, असा आरोप आहे. येथे त्यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी त्यांचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढला. मृतदेहाचे पोस्टमार्टम केल्यानंतर रेणुका स्वामी यांची हत्या झाल्याचे उघड झाले. यामध्ये अभिनेता दर्शन थुगुडेपाचे नाव पुढे आले आहे.
अभिनेता दर्शन थुगुडेपा याआधीही वादात सापडला आहे. २०११ मध्ये त्याचा पहिला वाद झाला, जेव्हा त्याच्या पत्नीने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. या प्रकरणात अटक केल्यानंतर अभिनेत्याला १४ दिवस न्यायालयीन कोठडीत राहावे लागले होते. २०१६मध्ये, पुन्हा एकदा दर्शनाच्या पत्नीने पोलिसांत 'आक्षेपार्ह वर्तनाची' तक्रार दाखल केली. २०२१मध्ये, अभिनेत्यावर म्हैसूरमधील एका हॉटेलमध्ये एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप होता. तर, २०२४मध्ये, त्याची एक रील समोर आली होती. ज्यामध्ये तो अभिनेत्री पवित्रा गौडासोबत वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये दिसला होता. नंतर त्याचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असल्याचे उघड झाले.