Kanguva Review In Marathi :‘अॅनिमल’च्या यशानंतर बॉबी देओलने साऊथ चित्रपटांमध्ये डेब्यू केला आहे. हिंदीतही प्रदर्शित झालेल्या या तमिळ चित्रपटाचे नाव आहे'कंगुवा', जो आज चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात साऊथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार सूर्या देखील मुख्य भूमिकेत आहे आणि दिशा पटानी देखील या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली आहे.मात्र, इतकी मोठी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकेल का, हा प्रश्न आहे. या चित्रपटाची जोरदार चर्चा असली, तरी या चित्रपटाच्या कथेतही अनेक त्रुटी आहेत.
चित्रपटाची कथा पेरुमाची बेटापासून सुरू होते, जिथे एक वृद्ध महिला म्हणते की, मानवी जीवनात सर्वात मोठे रहस्य आहे, तो का जन्मला, तो कुणासोबत का राहतो, दुसऱ्यासाठी का मरतो हे कुणालाच कळत नाही. तिथून कथा २०२४मध्ये येते, जिथे प्रयोगशाळेत मुलांच्या मेंदूवर प्रयोग केले जात असतात. एक मूल तिथून पळून जाते. मग, कथा गोव्यात पोहोचते, जिथे फ्रान्सिस (सूर्या), कोल्ट (योगी बाबू) बाउंटी हंटर्स आहेत. ज्या गुन्हेगारांना पोलिस पकडू शकत नाहीत, त्यांना हे लोक पकडून पोलिसांकडे देतात आणि त्या बदल्यात पैसे घेतात. प्रयोगशाळेतून पळून गेलेले मूल फ्रान्सिसपर्यंत पोहोचते. फ्रान्सिसलाही मुलाशी आपले नाते असल्यासारखे वाटते. तिथून पुन्हा कथा १०७० पेरुमाची येथे येते, जिथे राजाचा मुलगा कंगुवा (सूर्या) आहे. लॅबमधून पळून गेलेल्या मुलाचे नाव पूर्वा असे आहे. पूर्वाच्या वडिलांचा विश्वासघात केल्याबद्दल कंगुवाने त्याला जिवंत जाळलेले असते.
मात्र, तो त्याच्या मुलाला दत्तक घेतो. रोमन सम्राटाला एक बेट ताब्यात घ्यायचं आहे. तो उधिरन (बॉबी देओल) ची मदत घेतो जो अराथी बेटाचा प्रमुख आहे. या युद्धात कंगुवाकडून उधिरनच्या मुले मारली जातात. यामुळे कंगुवा आणि उधिरन यांच्यात वैयक्तिक वैर निर्माण होते. आता या दोघांच्या युद्धात पुढे काय होते, हे चित्रपटात पाहायला मिळते.
‘कंगुवा’ हा चित्रपट मुळात तमिळमध्ये बनला होता आणि तो हिंदीतही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात कल्पनाशक्तीची कमतरता नाही. १३०० वर्षांच्या फरकाने दोन वेगवेगळ्या कालखंडाचे चित्रण करणाऱ्या या चित्रपटाने कल्पनेचे असे उड्डाण घेतले आहे की, असा चित्रपट बनवण्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. पण, असे असूनही ॲक्शन-फँटसी चित्रपट'कंगुवा' हा मनोरंजक चित्रपट ठरू शकला नाही. याचित्रपटाची कथाकमकुवत, निर्जीव आणि अविश्वसनीय वाटते, जी तुम्हाला पडद्यावर काहीही घडू शकते हे पटवून देण्यासारखीच आहे.
कधीही न संपणाऱ्या युद्धाने चित्रपटाला कंटाळवाणे केले आहे.पेरुमाचीचा नाश करण्याच्या कटात अराथी नावाचे बेटही रोमला सामील होते. यानंतर असे युद्ध सुरू होते की, वाटू लागते हे युद्ध कधीच संपणार नाही आणि असेच चालू राहील.
दिग्दर्शक शिवा यांनीच स्वत: चित्रपटाची कथा लिहिली आहे. त्यांचे व्हिजन तसे मोठे आहे, परंतु स्पष्ट नाही. कंगुवा आणि उधिरन यांच्यातील लढा दाखवायचा होता आणि पुनर्जन्माचा अँगल ठेवायचा होता. मात्र, यात रोमन सम्राटाला फार महत्त्व दिलं आहे. कथा एवढी पसरवण्याऐवजी सरळ रुळावर आणली असती, तर ना अनेक पात्रांची नावं यात आली असती, ना चित्रपटाचा कालावधी उगाचचा वाढला असता. हा चित्रपट सरतेशेवटी अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात सोडतो. कारण, या चित्रपटाचा दुसरा भागही येणार असल्याचे सूर्याने आधीच सांगितले होते.
फ्रान्सिसच्या भूमिकेपेक्षा सूर्या कंगुवाच्या भूमिकेत जास्त प्रभावित वाटतो. दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या बॉबी देओलचा लूक आणि अभिनय चांगला आहे, पण दिग्दर्शक त्याचा योग्य वापर करू शकला नाही. दिशा पटानीचा अभिनय बघून असे वाटते की, ती ग्लॅमरच्या जोरावर किती काळ इंडस्ट्रीत टिकेल आणि तिला टिकून राहायचे असेल तरतिला अभिनय करावा लागेल. योगी बाबूंनाही मोजकेच सीन्स मिळाले आहेत. क्लायमॅक्समध्ये सूर्याचा धाकटा भाऊ कॅथीची एन्ट्री प्रभावी आहे.