Emergency box office collection Day 2: बॉलिवूड क्वीन कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट विविध वादांमधून बाहेर पडला आहे आणि आता तो चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अनेक वेळा पुढे ढकलण्यात आली आहे. इतक्या दिवसांनी प्रदर्शित होऊनही या चित्रपटाला प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाहीये. रिलीजच्या पहिल्या दिवशी चित्रपटाची सुरुवात खूपच संथ झाली. यानंतर, दुसऱ्या दिवशीही हा चित्रपट चांगला गल्ला कमावण्यात अपयशी ठरला आहे.
या चित्रपटाची निर्मिती मणिकर्णिका फिल्म्सने केली आहे. 'इमर्जन्सी'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर फक्त ३.११ कोटी रुपये कमावले आहेत. दुसऱ्या दिवशीही त्याला फारशी कमाई झाली नाही. वीकेंड असूनही, चित्रपट फक्त ३.५० कोटी रुपये कमवू शकला. आठवड्याच्या शेवटी त्याचा काही फायदा झाला नाही. एकूणच, कंगनाच्या या पीरियड-ड्रामा चित्रपटाने दोन दिवसांत फक्त ६.६१ कोटी रुपये कमावले आहेत.
कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अजय देवगणचा पुतण्या अमन देवगण स्टारर 'आझाद' या चित्रपटाशी टक्कर देत आहे. या चित्रपटातून अमन आणि रविना टंडनची लेक राशा थडानी यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. परंतु, आझादनेही बॉक्स ऑफिसवर काही विशेष कामगिरी केलेली नाही. आझादने दोन दिवसांत फक्त ३ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. दोन्ही चित्रपट एकत्र प्रदर्शित झाल्यामुळे कलेक्शन विभागले गेले आहे असे दिसते.
या राजकीय नाट्यमय चित्रपटात कंगना राणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारताना दिसत आहे. हा चित्रपट १९७५ ते १९७७ या २१ महिन्यांच्या आणीबाणीवर केंद्रित आहे. सेन्सॉर प्रमाणपत्र आणि शीख समुदायाचे चुकीचे प्रतिनिधित्व केल्याच्या आरोपांमुळे वादात सापडलेला 'इमर्जन्सी' हा चित्रपट दीर्घ प्रतीक्षेनंतर शुक्रवारी देशभरात प्रदर्शित झाला आहे.
यावर, गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने (SGPC) चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. ज्यामध्ये असा आरोप करण्यात आला होता की त्यात शिखांचे चरित्र आणि इतिहास चुकीच्या पद्धतीने सादर केला गेला आहे आणि त्याचा वापर शीखांच्या भावनाविरोधी चित्रण करण्यासाठी केला जात आहे. आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यास सांगण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या