बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी लाँच करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलरची खूप दिवसांपासून वाट पाहिली जात होती. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत असून तिनेच या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी कंगनाने शाहरुख खान, सलमान खान आणि आमीर खान या बॉलिवूडच्या तीनही खानसोबत चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली.
कंगना रणौतने तिन्ही खानसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'मला या तिन्ही खानसोबत चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करायला आवडेल. मला माझी चांगली बाजू दाखवून द्यायची आहे. माझ्या चित्रपटात ते अभिनय करतील आणि अतिशय चांगल्या पद्धतीने दिसतील. समाजासाठी जे चांगले आहे असे काम देखील ते करु शकतात. मला असाच एखादा चित्रपट करायचा आहे. कारण मला माहिती आहे, हे तीनही खान अतिशय हुशार आहेत' असे कंगना म्हणाली.
कंगना रणौतने अनेकदा शाहरुख आणि आमीर खानविरोधात वक्तव्य केले आहे. पण या कार्यक्रमात कंगनाने तिघांचीही प्रशंसा केली आहे. 'ते जे काही करत आहेत, ते चित्रपटसृष्टीला भरपूर महसूल मिळवून देत आहेत. आणि त्याबद्दल आपण त्यांचे आभार मानले पाहिजेत. मला वाटतं या तिघांचीही एक अतिशय कलात्मक बाजू आहे जी काही चित्रपट वगळता इतरत्र कुठेही दाखवली गेलेली नाही' असे कंगना म्हणाली. पुढे कंगनाने दिवंगत अभिनेता इरफान खानचा देखील उल्लेख केला. 'ज्या अभिनेत्याचे मी दिग्दर्शन करू शकले नाही आणि त्यासाठी माझ्या मनात खंत आहे तो अभिनेता म्हणजे इरफान खान सर. तो माझ्या आवडत्या खानपैकी एक आहे आणि मी त्याला कायम लक्षात ठेवेन' असे कंगना म्हणाली.
वाचा : नफरत, नफरत, नफरत और मिला क्या है मुझे; अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित
'इमर्जन्सी'च्या ट्रेलर लाँचवेळी कंगनाने तिच्यावर चित्रपटसृष्टीने बहिष्कार टाकल्याचे सांगितले आहे. कंगनाचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात लादलेल्या आणीबाणीवर आधारित आहे. या चित्रपटात कंगनासोबत अनुपम खेर, महिमा चौधरी, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे आणि दिवंगत सतीश कौशिक यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.