Kangana Ranaut Vs Javed Akhtar Case: जावेद अख्तर मानहानी प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने कंगना रनौतला मोठा धक्का दिला आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीवरून सुरू असलेल्या या खटल्याला स्थगिती देण्याची कंगना रनौतची याचिका न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, जावेद अख्तर यांनी २०२०मध्ये दाखल केलेल्या मानहानी प्रकरणातील या खटल्यावर कंगनाने दाखल केलेली रिट याचिका आता मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. कंगनाने देखील जावेद अख्तर यांच्यावर खंडणी, गुन्हेगारी कट रचणे आणि तिच्या गोपनीयतेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.
या प्रकरणी न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी सुनावणी करताना आदेश दिला आणि सांगितले की, सदर कारवाई थांबवता किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या तक्रारीसोबत एकत्रित केली जाऊ शकत नाही. कारण, कंगना रनौतने कधीही असा युक्तिवाद केला नाही की, ही प्रकरणे क्रॉस-केस आहेत. तर, जावेद अख्तर यांची तक्रार प्रथम दाखल करण्यात आली. न्यायमूर्ती प्रकाश नाईक म्हणाले की, 'याचिकेत मागितलेला दिलासा या टप्प्यावर देता येणार नाही. याआधी याचिकाकर्त्याच्या वतीने कधीही असा युक्तिवाद करण्यात आला नाही की, दोन्ही प्रकरणे क्रॉस केस आहेत.’
जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना रनौत विरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला अंधेरीतील दंडाधिकाऱ्यांसमोर सुरू असून, कंगनाच्या तक्रारीला सत्र न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तिने दाखल केलेल्या या रिट याचिकेत कंगनाने म्हटले होते की, या दोन्ही प्रकरणांची सुरुवात २०१६मध्ये झालेल्या बैठकीत झाली होती, त्यामुळे त्यांचा एकत्रित खटला चालवावा.
२०२०मध्ये, जावेद अख्तर यांनी कंगना रनौत हिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. कंगना रनौतने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले होते की, हृतिक रोशनशी तिच्या कथित अफेअरबद्दल आणि त्यांच्या भांडणाच्या दरम्यान जावेद अख्तर यांनी तिला घरी बोलावून धमकी दिल्याचा आरोप केला होता. कंगना रनौतने जावेद अख्तर यांच्या विरुद्ध खंडणी मागिल्याची आणि धमकावल्याची तक्रार दाखल केली होती. कंगना रनौतने तिच्या तक्रारीत म्हटले होते की, 'क्रिश ३'मधील तिचा सह-कलाकार हृतिक रोशन याच्यासोबत तिचे वाद सुरू झाल्यानंतर जावेद अख्तर यांनी तिला आणि तिची बहीण रंगोलीला वाईट हेतूने आपल्या घरी बोलावले आणि नंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करून धमकावले.
संबंधित बातम्या