Kangana Ranaut Vs Javed Akhtar: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आणि जावेद अख्तर यांच्यातील वाद काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आता कंगनाने या प्रकरणी कोर्टात स्पष्टीकरण देत, आपण आत्महत्या करण्याचा विचारही केला असल्याचे म्हटले आहे. अभिनेत्री कंगना रनौत केवळ तिच्या कामासाठीच नाही, तर तिच्या स्पष्टवक्ता शैलीमुळेही नेहमीच चर्चेत असते. कंगना रनौत आणि जावेद अख्तर यांच्यात अनेक वर्षांपासून कायदेशीर लढाई सुरू आहे. सध्या हे प्रकरणही चर्चेत येत असून, त्यांच्यातील हा वाद थांबण्याची चिन्हे दिसत नाहीयत. आता पुन्हा एकदा अभिनेत्रीला या प्रकरणी न्यायालयात हजर राहावे लागले आहे. यावेळी कंगनाने तिच्या स्पष्टीकरणात अतिशय धक्कादायक खुलासा केला आहे
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कंगना रनौत अंधेरी मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर झाली होती. यावेळी आपले म्हणणे मांडताना तिने सांगितले की, ‘बॉलिवूड इंडस्ट्रीत बाहेरून येणाऱ्या लोकांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. मी देखील याचा सामना केला आहे आणि याबद्दल अनेकदा तक्रारही केली आहे. जेव्हा सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली, तेव्हा हा विचार माझ्याही मनात आला होता. कारण, सुशांतच्या आत्महत्येचा माझ्यावर मोठा परिणाम झाला होता.
कंगना रनौतने जावेद अख्तर यांच्या विरोधात तक्रार दाखल करताना त्यात म्हटले होते की, २०१६मध्ये जेव्हा तिचा हृतिक रोशनसोबत वाद झाला होता, तेव्हा जावेद अख्तर यांनी तिला आपल्या घरी बोलावले होते आणि धमकीही दिली होती. मात्र, जावेद अख्तर यांनी कंगना रनौतचा हा दावा पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना कंगना रनौत म्हणाली की, जेव्हा तिची जावेद अख्तर यांच्यासोबत ही भेट झाली, तेव्हा ती खूप अस्वस्थ झाली होती. यानंतर ती नैराश्यात गेली होती.
या वादावर निर्वाळा देताना आपण मुलाखत देताना ओघओघात जावेद अख्तर यांचे नाव घेतल्याचे कंगना रनौत म्हटले. मात्र, त्या मुलाखतीतून मला लोकांना हे सांगायचे होते की, चित्रपटसृष्टीत बाहेरच्या लोकांना कशी वागणूक दिली जाते. मला टार्गेट करणाऱ्याना मी टार्गेट करावे, हा माझा स्वभाव नाही. मात्र, आता जावेद अख्तर यांचे वकील पुढील तारखेला कंगनाची पुन्हा चौकशी करणार आहेत. सध्या अभिनेत्री कंगना रनौत तिच्या आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून कंगनाचे अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेले नाहीत. केवळ कंगनाच नाही, तर निर्मात्यांनाही या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
संबंधित बातम्या