Kangana Ranaut Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आज रामजन्मभूमी अर्थात अयोध्येतील राम मंदिरात पार पडलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अयोध्येत पोहोचली होती. या सोहळ्यात अनेक दिग्गज व्यक्तीही सहभागी झाल्या होत्या. कंगना रनौत राम मंदिरातील सोहळ्याच्या एक दिवस आधीच अयोध्येत पोहोचली होती. आता रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडताच कंगना रनौतने चांगलाच जल्लोष केला आहे. तिच्या या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नुकतीच कंगना रनौत मधुर भांडारकरसोबत अयोध्येतील राम मंदिर परिसरात रामलल्लाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा बघताना दिसली होती. राम मंदिर प्राण प्रतिष्ठेनंतर अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रामलल्लावर फुलांची उधळण झाल्यावर 'जय-जय श्री राम' असा जयघोष करताना दिसली आहे. आजबाजूच्या लोकांची मीडियाची पर्वा न करता कंगना रनौत जोरजोरात घोषणा देत होती. कंगनाचा हा अंदाज पाहून चाहते तिचं कौतुक करत आहेत. कंगना रनौतचा हाच दिलखुलास अंदाज चाहत्यांना खूप आवडतो. आता तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या अयोध्येत असून, ती केवळ राम मंदिरच नाही तर अयोध्येतील वेगवेगळ्या मंदिरांना भेट देत आहे. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याव्यतिरिक्त कंगनाने इतर धार्मिक विधींमध्ये देखील भाग घेतला होता. अयोध्येत आलेल्या कंगनाने जगद्गुरू रामभद्राचार्य यांची भेट घेतली. याशिवाय त्यांनी प्रसिद्ध हनुमानगढ़ी मंदिराला भेट दिली आणि परिसरात स्वच्छता देखील केली. याशिवाय तिने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेआधी तिने बागेश्वर धाम सरकार यांचीही भेट घेतली.
कंगना रनौत अयोध्येतून अनेक अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत आहे. प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात देखील ती सामील झाली होती. यावेळी कंगना रनौत हिने एक सुंदर मोती रंगाची साडी नेसली होती. या साडीत कंगना रनौत खूप सुंदर दिसत होती. नुकत्याच व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये कंगना रनौत दोन्ही हात वर करून राम नामाचा जयघोष करताना दिसली आहे. कंगना रनौत सध्या तिच्या या व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.