Kangana Ranaut Praises Aryan Khan : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही अशा काही स्टार्सपैकी एक आहे, जिने सर्वप्रथम इंडस्ट्रीमध्ये घराणेशाहीचा म्हणजेच नेपोटीझम मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, यावेळी कंगना रणौतने शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे कौतुक करत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. बॉलिवूड किंग शाहरुख खानचा मुलगा मनोरंजन विश्वात प्रवेश करणार आहे. मात्र, आर्यन खान अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणार आहे. म्हणूनच कंगना रणौतनेही या धाडसी पावलाचे कौतुक केले आहे.
आर्यन खान लवकरच एक वेब सीरिज घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज त्याने बनवली आणि दिग्दर्शित केली आहे. मंगळवारी, नेटफ्लिक्सने याबद्दल अधिकृत घोषणा केली आणि म्हटले की, ही वेब सीरिज २०२५मध्ये लॉन्च केली जाईल. आर्यन खानच्या वेब सीरिजची घोषणा होताच कंगना रणौतपासून ते आलिया भट्ट, सुहाना खान, अनन्या पांडेपासून शनाया कपूरपर्यंत सगळ्यांनीच प्रतिक्रिया देत त्याचे कौतुक केले आहे. सगळ्यांनीच आर्यन खानच्या या पावलाला पाठिंबा दिला आहे. कंगना रणौतने आर्यन खानच्या दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल टाकण्याच्या निर्णयाचे कौतुक केले.
आर्यन खानच्या वेब सीरिजशी संबंधित बातम्या इंस्टाग्रामवर शेअर करताना, कंगना रणौतने लिहिले, 'फिल्मी कुटुंबातील मुले काहीतरी नवीन करत आहेत, हे खूप चांगले पाऊल आहे. आता ते केवळ मेकअप करून आणि वजन कमी करून स्वत:ला अभिनेता मानत नाहीत. आपण सर्वांनी मिळून भारतीय चित्रपटांचा दर्जा उंचावायचा आहे. कॅमेऱ्याच्या मागे काम करण्यासाठी आम्हालाही लोकांची गरज आहे. आर्यन खानने नवा मार्ग निवडला हे खूप चांगले पाऊल आहे. दिग्दर्शक आणि लेखक म्हणून त्याचे पदार्पण पाहणे मनोरंजक असेल.’
आर्यन खानचे कौतुक करत करण जोहरनेही पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले की, ‘आर्यन खानला खूप खूप प्रेम. खूप अभिमान वाटतोय. तू खूप प्रगती कर.’ तर, सुहाना खाननेही तिच्या भावाच्या पदार्पणाबद्दल पोस्ट केली आहे. तर, शाहरुख खाननेही लेकाला शुभेच्छा दिल्या आहेत. आर्यन खानची वेब सीरिज ही नेटफ्लिक्स या प्रसिद्ध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकतीच नेटफ्लिक्सने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले की, ‘नेटफ्लिक्स आणि रेड चिलीज एंटरटेनमेंट २०२५मध्ये एका विशेष नाव नसलेल्या बॉलिवूड सीरिजसाठी एकत्र येत आहेत. गौरी खान निर्मित या मालिकेतून आर्यन खान निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे.’