Kangana Ranaut Post after Vinesh Phogat win: भारताची सिंहिणी विनेश फोगाट हिने पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये इतिहास रचला आहे. तिने उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा ५-० असा पराभव करून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. विनेशने मंगळवारी ५० किलो वजनी गटात सलग विजय मिळवत रौप्यपदक निश्चित केले असून, आता अंतिम फेरी जिंकून सुवर्णपदक जिंकण्याची संधी पटकावली आहे. यानंतर आता राजकारणी-अभिनेत्री कंगना रनौतने सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपला आनंद व्यक्त केला आहे. मात्र, यावेळी तिने पंतप्रधान नरेंद मोदी यांचं कौतुक केलं आहे.
कंगना रनौतने लिहिले की, ‘भारताच्या पहिल्या सुवर्णपदकासाठी फिंगर्स क्रॉस. विनेश एकदा आंदोलनात सहभागी झाली होती, ज्यात तिने ’मोदी तेरी कब्र खुदेगी'सारख्या घोषणा देऊनही तिला आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची आणि सर्वोत्तम प्रशिक्षण, प्रशिक्षक आणि सुविधा मिळवण्याची संधी देण्यात आली. हीच लोकशाहीची आणि महान नेत्याची ओळख आहे.' कंगना रनौतच्या या पोस्टवर आता सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकांनी तिच्या या मुद्द्याचे समर्थन केले आहे, तर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली आहे.
विनेश भारतासाठी सुवर्णपदक जिंकेल, असा विश्वास माजी कुस्तीपटू महावीर फोगाट यांनी व्यक्त केला. विनेशच्या या ऐतिहासिक विजयाचा आनंद तिच्या कुटुंबीयांनी आणि बलाई गावाने साजरा केला. सर्वांनी एकत्र बसून विनेशचा उपांत्य सामना पाहिला. विजयानंतर विनेशने ऑलिम्पिक स्थळावरून आपल्या कुटुंबियांना व्हिडीओ कॉल करून आपल्या भावना त्यांच्याशी शेअर केल्या. याआधी उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना २०२०च्या टोकियो चॅम्पियन युई त्सुसाकीशी झाला होता.
पहिल्या फेरीत त्सुसाकी १-० ने आघाडीवर असतानाही विनेशने दुसऱ्या फेरीत तिला ३-२ असे पराभूत केले. हा विजय देखील ऐतिहासिक आहे कारण ८२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सुसाकीने प्रथमच पराभवाची चव चाखली आहे. संपूर्ण देश विनेशच्या पुढील विजयाकडे पाहत आहे. सोशल मीडियावर लोकांनी भारताच्या लेकीसाठी सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली आहे.
विनेश फोगाटने प्रदीर्घ काळानंतर कुस्तीमध्ये पुन्हा प्रवेश केला आणि परत येताच तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विक्रम रचला आहे. तिने प्रथम उपांत्यपूर्व फेरीत भाग घेतला आणि युक्रेनच्या ओसाना लिवाचचा पराभव केला. यानंतर तिने उपांत्य फेरीत क्युबाच्या युस्नेलिस गुझमन लोपेझचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले. त्याची कामगिरी देशासाठी खरोखरच अभिमानास्पद ठरली आहे. आता सगळेच विनेश फोगाट अंतिम फेरी जिंकून देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याची वाट पाहत आहोत.