बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत कायमच चर्चेत असते. आजकाल तिचे सर्वच चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करताना दिसत नाहीत. कंगना तिच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कंगना रणौत कोणाला डेट करत आहे? असा प्रश्न सर्वांना पडला होता. तिचे नाव EaseMyTrip या कंपनीचे संस्थापक निशांत पिट्टी यांच्यासोबत जोडले गेले. त्यावर आता कंगनाने प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिला आहे.
कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर निशांत पिट्टीसोबतच्या अफेअरच्या अफवा पसरवणाऱ्यांना चांगलेच सुनावले आहे. तिने "मीडियाला माझी नम्र विनंती, कृपया चुकीची माहिती पसरवू नका, निशांत पिट्टी हा विवाहित आहे आणि मी दुसऱ्या कोणाला तरी डेट करत आहे. त्यामुळे योग्य वेळेची वाट पहा. कृपया आम्हाला लाजवू नका, एकत्र फोटो काढले म्हणून एका तरुण महिलेचे नाव दररोज नवीन पुरुषाशी जोडणे हे चांगले नाही. कृपया असे करू नका" या आशयाची पोस्ट केली आहे.
वाचा: शशांक केतकरने खरेदी केले नवे घर, फोटो का शेअर केला नाही सांगितले कारण
कंगनाच्या या पोस्टनंतर आता कंगना कोणाला डेट करत आहे? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. काही दिवसांपूर्वी कंगना एका मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली. त्यानंतर कंगनाच्या अफेअरची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली. त्यावर देखील कंगनाने पोस्ट शेअर केली होती. "या मिस्ट्री मॅनबद्दल विचारण्यासाठी मला अनेक कॉल्स आणि मेसेज येत आहेत. मी त्याच्यासोबत अनेक वेळा सलूनच्या बाहेर हँग आउट करत असते. एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्यावर एकत्र चालू शकतात, त्यामुळे केवळ सेक्शुअल कारणांपेक्षा यामागे काही वेगळी कारणे असू शकतात. ते पुरुष आणि स्त्री सहकारी असू शकतात, भावंडे असू शकतात, मित्र असू शकतात किंवा तो एक हेअर स्टायलिस्ट असू शकतो" असे ती म्हणाली होती.
कंगनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिचा 'ईमर्जन्सी' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट जूनमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौत स्वत: करत आहे. ती या चित्रपटात माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. श्रेयस तळपदे भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनुपम खेर हे जय प्रकाश नारायण यांची भूमिका साकारणार आहेत. आता संजय गांधी यांच्या भूमिकेत अभिनेता विशाक नायर दिसणार आहेत.