बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ अर्थात अभिनेत्री कंगना रनौत हिला आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. कंगना सिनेमापासून ते राजकारणापर्यंत आणि भारतापासून ते जगभरातील विविध मुद्द्यांवर अतिशय बिनधास्त बोल बोलते. कंगना रनौतने आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक पुरस्कार मिळवले, तर दुसरीकडे ती अनेक वादातही अडकली होती. कंगनाचा जन्म २३ मार्च १९८७ रोजी झाला. कंगनाचा जन्म हिमाचल प्रदेशातील एका गावात झाला होता. कंगनाचे पणजोबा आमदार, आजोबा आयएएस अधिकारी आणि वडील व्यापारी होते. तर, कंगनाची आई शिक्षिका होती.
कंगना रनौतची स्वप्ने मोठी होती, त्यामुळे ती वैद्यकीय शिक्षण सोडून दिल्लीत आली. आधी तिने दिल्लीत मॉडेलिंग केले आणि नंतर मुंबईत येऊन थिएटर केले. कंगनाने दिल्लीतील नाट्य दिग्दर्शक अरविंद गौर यांच्याकडून अभिनयाचे धडे गिरवले. जेव्हा ती मुंबईत आली, तेव्हा तिला आदित्य पांचोलीचा आधार मिळाला. या दरम्यान दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात होते. यानंतर कंगनाने महेश भट्ट यांची भेट घेतली आणि २००६मध्ये कंगनाची बॉलिवूड इनिंग सुरू झाली. अनुराग बसू दिग्दर्शित 'गँगस्टर' हा कंगनाचा पहिला चित्रपट होता. यानंतर कंगनाने कधीच मागे वळून पाहिले नाही. कंगना रनौतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे चार राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. कंगनाला पद्मश्रीनेही गौरवण्यात आले आहे.
कंगना रनौतने वैद्यकीय शिक्षण सोडले, तेव्हा तिचे कुटुंबीय तिच्यावर खूप नाराज झाले होते. त्यांची नाराजी इतकी वाढली होती की, घरच्यांनी कंगनाशी बोलणंही बंद केलं होतं. परंतु, ‘लाईफ इन अ मेट्रो’ने या चित्रपटाने ही परिस्थिती बदलली. २००७मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर कंगना आणि तिच्या कुटुंबियांमध्ये पुन्हा बोलणी सुरू झाली. आता कंगना रनौतची मॅनेजर तिची मोठी बहीण रंगोली आहे.
कंगना केवळ तिच्या अभिनय आणि वादांमुळेच नाही, तर करिअरच्या सुरुवातीच्या काळात ती तिच्या अफेअर्समुळेही चर्चेत होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंगना रनौतचे आदित्य पांचोली, अध्ययन सुमन आणि हृतिक रोशनसोबत अफेअर्सच्या चर्चा रंगल्या होत्या. कंगनाचे नाव अजय देवगणशीही जोडले गेले होते. एकीकडे कंगना रनौतने तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी बरीच प्रशंसा मिळवली, तर दुसरीकडे तिचे नाव अनेक वादातही अडकले. करिअरच्या सुरुवातीपासूनच कंगना वेगवेगळ्या कारणांमुळे अडचणीत येत राहिली. कंगना रनौत कधी तिच्या भांडणांमुळे, तर कधी हृतिक रोशनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती. कंगनाने आदित्य पांचोली आणि हृतिकवर अनेक गंभीर आरोप केले होते. शेखर सुमन यांचा मुलगा अध्ययन सुमन यानेही आपल्यावर प्राणघातक हल्ला आणि काळी जादू केल्याचा आरोप कंगनाने केला होता. कंगना रनौतने करण जोहरवर देखील अनेक आरोप केले होते. कंगनाचे उद्धव ठाकरेंसोबतचे वादही खूप चर्चेत होते.