Urmila Kothare Car Accident : मुंबईत सध्या अपघातांची मालिका सुरूच आहे. यातच अभिनेत्री उर्मिला कानेटकर-कोठारे हिच्या कारचा देखील एक भीषण अपघात झाल्याचे नुकतेच समोर आले होते. शुक्रवारी मध्यरात्री कांदिवलीतील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ हा अपघात झाला, ज्यामध्ये एक मेट्रो कामगार मृत्युमुखी पडला आणि उर्मिला कानेटकर-कोठारे यांच्यासह कार चालक आणि एक अन्य कामगार जखमी झाले. या प्रकरणी आता कार चालकाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री उर्मिला कोठारे या आपल्या शूटिंग संपवून घरी परतत होती. ती ठाणे येथील आपल्या घराच्या दिशेने जात असताना, जोगेश्वरी येथे एक सहकाऱ्याला सोडून घोडबंदर मार्गाने पुढे जात होती. रात्री साडेबाराच्या सुमारास तिचा कारचालक गजानन पाल याचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि कार पोईसर मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या दोन कामगारांना धडकली.
या अपघाताचे शिकार झालेले हे कामगार सम्राट दास आणि सुजन रोहिदास मेट्रोच्या कामासाठी तेथे कार्यरत होते. कारच्या धडकेत दोघेही गंभीरपणे जखमी झाले, आणि सम्राट दास याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अपघातानंतर कार चालक गजानन पाल याने गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचवेळी कार जेसीबी मशीनवर जाऊन आदळली. या अपघातामुळे कारच्या पुढील भाग चक्काचूर झाला. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
उर्मिला कोठारे आणि गजानन पाल यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उर्मिलाच्या तब्येतीबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी या अपघाताच्या संदर्भात गजानन पाल याच्यावर निष्काळजीपणाने वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला आहे, आणि त्याला अटक करण्यात आली आहे.
उर्मिला कानेटकर-कोठारे ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे. तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये भूमिका साकारली आहे. काही महिन्यांपूर्वी ती 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत वैदेहीची भूमिका साकारत होती. सध्या ती काही महिन्यांपासून डान्सच्या कार्यशाळा घेत आहे आणि तिच्या आगामी प्रोजेक्ट्सबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे तिचे चाहते तिच्या या अपघाताची माहिती मिळताच तिचे चाहते काळजीत पडले आहेत. अभिनेत्रीच्या तब्येतीची माहिती समोर आली नसल्याने चाहत्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
संबंधित बातम्या