दाक्षिणात्य अभिनेते आणि दिग्दर्शक बॉलिवूड अभिनेता अरशद वारसीवर सध्या जोरदार टीका होत आहे. अरशद वारसीने एका चॅट शोमध्ये 'कल्की 2898 एडी' हा चित्रपट पाहून अभिनेता प्रभासच्या अभिनयावर भाष्य केले. 'मला फार दु:ख होतय. प्रभास एखाद्या जोकरप्रमाणे दिसत आहे. मला मॅड मॅक्स पाहायचा आहे. मला तेथे मेल गिब्सन बघायला आवडले. यार, तू त्याचं काय केलं आहेस. तू असं का करतोस? मला समजत नाही' असे अरशद म्हणाला होता. आता दाक्षिणात्य कलाकाराने अर्शदला चांगलेच सुनावले आहे.
दाक्षिणात्य अभिनेता नानीने संताप व्यक्त केला आहे. नानी म्हणाला की, "तुम्ही ज्या व्यक्तीचा उल्लेख करत आहात त्याला या वक्तव्यानंतर आतापर्यंतची चांगली प्रसिद्धी मिळाली असावी. तुम्ही विनाकारण या विषयाला इतके महत्त्व देत आहात."
'आरएक्स १००'चे दिग्दर्शक अजय भूपती म्हणाले, 'प्रभास हा असा माणूस आहे ज्याने भारतीय सिनेमा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. तो आपल्या देशाचा अभिमान आहे. मतं व्यक्त करा, पण मतं व्यक्त करण्याची एक पद्धत आहे... प्रभासबद्दल तू जे बोललास ते खरंच तू बोलत आहेस का असा मला प्रश्न पडला आहे."
सुधीर बाबू म्हणाले, 'कुणावर टीका करणे ठीक आहे, पण कुणाला शिवीगाळ करणे योग्य नाही. अर्शद वारसीमध्ये व्यावसायिकतेचा अभाव आहे हे मला माहित नव्हते. बरं, प्रभासची उंची खूप मोठी आहे, या छोट्या विचारसरणीच्या लोकांच्या वक्तव्यांनी त्याला काहीफरक पडणार नाही.'
वाचा: सैफ अली खानवर दिल्लीतील नाइट क्लबमध्ये झाला होता हल्ला, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
तेलुगू अभिनेते-लेखक सिद्धू जोनालागड्डा यांनी 'कल्की २८९८' हा भारतीय चित्रपटसृष्टीचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला की, तो प्रभासचा फॅन आहे. अर्शद वारसीसाठी पोस्ट शेअर करत त्याने लिहिले की, "प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण तुम्ही तुमचे मत कसे मांडता हे खूप महत्त्वाचे आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही अभिनेता असाल आणि इंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण करणे आणि काम करत राहणे किती अवघड आहे हे तुम्हाला माहित असेल. टीकेसाठी आपण सर्व जण मोकळे आहोत, पण 'विदूषक' असे शब्द वापरणे कोणीही योग्य नाही."