Kakuda Movie Review In Marathi: बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता रितेश देशमुख स्टारर हॉरर कॉमेडी चित्रपट 'काकुडा' आज म्हणजेच १२ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म ‘झी ५’वर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना ओटीटीवर थिएटरची मजा देत आहे. हा चित्रपट हॉरर असला तरी, प्रेक्षकांना बऱ्याचदा हसवतो. ‘हीरामंडी’नंतर सोनाक्षी सिन्हा पुन्हा एकदा दुहेरी भूमिकेत दिसली असून, तिने आपलं काम चोख पार पाडलं आहे. या चित्रपटात रितेश देशमुखची एन्ट्री जरा उशीराच होते. मात्र, तो पडद्यावर येताच चांगलाच धमाका होतो. चला तर मग जाणून घेऊया काय आहे चित्रपटाची कथा आणि त्याचे पॉझिटिव्ह-निगेटिव्ह पॉईंट…
चित्रपटाची कथा 'रतौडी' नावाच्या एका गावाची आहे, जिथे गेल्या ५० वर्षांपासून प्रत्येक घराला दोन दरवाजे आहेत. पहिला मुख्य दरवाजा जो सर्वसामान्य लोक वापरतात आणि दुसरा दरवाजा पहिल्या दरवाजापेक्षा खूपच लहान आहे, जो दर मंगळवारी संध्याकाळी ७.१५ वाजता उघडून ठेवावा लागतो. ज्या घराचा दरवाजा बंद दिसतो, त्या घराला 'काकुडा'चा तडाखा बसतो आणि त्या घरातील माणसाच्या पाठीवर एक मोठे कुबड बाहेर येते. कुबड आल्यानंतर १३ दिवसांच्या आत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. गावातील लोकांना या सगळ्याची इतकी सवय झाली आहे की, पाठीवर कुबड दिसू लागताच, लोक त्या व्यक्तीच्या अंत्यसंस्काराची आणि तेराव्याची तयारी करू लागतात.
रतौडी गावात सनी (साकिब सलीम) नावाचा मुलगा इंदिराच्या (सोनाक्षी सिन्हा) प्रेमात पडतो. इंदिरा दुसऱ्या गावात राहते आणि तिचा भूतांवर अजिबात विश्वास ठेवत नाही. इंदूचे वडील शिक्षक आहेत आणि आपल्या मुलीसाठी अस्खलित इंग्रजी येत असलेल्या मुलाच्या शोधात आहेत. पण, इंदू हलवाई असलेल्या सनीवर प्रेम करत आहे. त्यांच्या लग्नाला नकार मिळताच, इंदू आणि सनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण, पंडितजींनी लग्नासाठी सांगितलेला मुहूर्त मंगळवारी येत असून, दर मंगळवारी 'काकुडा' येतो, ज्यासाठी घराचा छोटा दरवाजा उघडून वाट पाहावी लागते.
सनी, त्याचे मित्र किल्विश (आसिफ खान) आणि इंदू ठरवतात की ज्या दिवशी लग्न होणार आहे, त्या दिवशी सनी आपल्या वडिलांवर दरवाजा उघडा ठेवून, दारात बसण्याची जबाबदारी देईल, जेणेकरून 'काकुडा'चा शापही टाळता येईल आणि मुहूर्ताच्या दिवशी लग्नही होईल. पण, कथेत ट्विस्ट तेव्हा येतो, जेव्हा सनीला कळते की, त्याचे वडील तीर्थयात्रेला जात आहेत. इंदूच्या दबावामुळे सनी रिस्क घेऊन, दुसऱ्या गावात लग्नासाठी जातो. घाईघाईत लग्न पार पडते आणि सनी आपल्या गावी येतो. पण, त्याला उशीर होतो आणि ७.१५ वाजता त्याला घराचा दरवाजा उघडता येत नाही. त्याचा परिणाम असा होतो की, त्याला 'काकुडा'चा शाप लागतो आणि सनीच्या पाठीवर कुबड येते.
सुशिक्षित आणि विज्ञानावर विश्वास ठेवणारी इंदू दिल्लीला जाऊन सनीवर उपचार करून, त्याला बरं करेनच असा निर्णय घेते. पण, शस्त्रक्रियेच्या दुसऱ्याच दिवशी सनीला पुन्हा त्याच ठिकाणी कुबड बाहेर येते, तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसतो. आता इंदू व्हिक्टर नावाच्या (रितेश देशमुख) घोस्ट हंटरची मदत घेण्याचे ठरवते. आता व्हिक्टर आणि इंदू मिळून सनीला वाचवू शकतील का? गावकऱ्यांना एवढा वेदनादायी मृत्यू देणारा हा काकुडा कोण आहे? काकुडा नावाच्या या भूताची कथा काय आहे? या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी तुम्हाला चित्रपट बघावा लागेल.
अप्रतिम लोकेशन्सवर या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले असून, पार्श्वसंगीतही अप्रतिम आहे. दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा हॉरर कॉमेडी चित्रपटांचा अनुभव स्पष्टपणे दिसून येतो आणि त्यांनी भीती-विनोद या भावनांचा सुंदर समतोल साधला आहे. चित्रपटात कुठलीही भीतीदायक दृश्ये जबरदस्तीने घालण्यात आलेली नाही. आणि जिथे ती वापरली आहेत, तिथे त्यांना पूर्णपणे न्याय दिला गेल आहे. चित्रपटात व्हीएफएक्सचा वापर कमी पण नेमका करण्यात आला आहे. सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख, साकिब सलीम यांच्यासह सर्वच कलाकारांनी आपलं काम चोख पार पाडलं आहे. चित्रपटात मोजकीच गाणी आहेत, पण ती प्रखर कथेत मजा देतात. एकंदरीत 'काकुडा' हा एक अप्रतिम थिएटर मटेरियल सिनेमा आहे ज्याचा आनंद तुम्ही संपूर्ण कुटुंबासोबत बसून घेऊ शकता.
आदित्य सरपोतदार यांच्या या चित्रपटात निगेटिव्ह पॉईंट्स तसे नाहीत. पण, हल्ली सुरू असलेला ट्रेंड पाहता चित्रपटाच्या शेवटी पुढच्या भागासाठी वाव सोडण्यात आला आहे. पहिला भाग खूप दमदार आहे. पण, दुसऱ्या भागाची कथाही तितकीच दमदार असेल का? चित्रपटातील कथेशी निगडित काही प्रश्न मनात घोळत राहतात. पण, हे कुतूहल शेवटपर्यंत टिकून राहते आणि कुतुहलच राहते. कदाचित पुढच्या भागासाठी निर्मात्यांनी काही गोष्टी मुद्दामहून ताणून ठेवल्याची शक्यता आहे.
कलाकार: सोनाक्षी सिन्हा, रितेश देशमुख, साकिब सलीम, आसिफ खान, सचिन अँटी
दिग्दर्शक: आदित्य सरपोतदार
कुठे बघाल?: झी ५
संबंधित बातम्या