प्रसिद्ध बॉलिवूड गायक कैलाश खेर आज (७ जुलै) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. गायक कैलाश खेर यांना आजघडीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. आता ते यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का, की इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना आयुष्यात अनेक कठीण टप्पे पार करावे लागलेत. त्यांच्या आयुष्यात एक काळ असा आला होता, जेव्हा त्यांनी आपले आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी आत्महत्या करण्यासाठी गंगा नदीत उडीही मारली होती.
मेरठमध्ये जन्मलेल्या कैलाश खेर यांना संगीताचा कौटुंबिक वारसा मिळाला होता. त्यांचे वडील पंडित मेहर सिंह खेर हे पुजारी होते आणि ते कार्यक्रमांमध्ये पारंपारिक लोकगीते गायचे. कैलाश खेर यांनी बालपणीच वडिलांकडून संगीताचे धडे घेतले होते. यामुळे त्यांचे संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित झाले. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी जेव्हा कैलाश खेर यांनी त्यांच्या वडिलांची गाणी स्वतःच्या आवाजात गायला सुरुवात केली, तेव्हा त्यांची प्रतिभा पाहून सगळेच दंग झाले.
कैलाश खेर यांनी वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी संगीतासाठी घर सोडले. कैलाश खेर यांना आपल्या प्रतिभेला वाव देण्यासाठी संगीत गुरूची गरज आहे, असे वाटले. घर सोडल्यानंतर कैलाश खेर यांनीही संगीताचे धडे देण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना दर सेशनचे १५० रुपये मिळत होते. पण, यावरही कैलाश खेर यांचे समाधान झाले नाही. उदरनिर्वाहासाठी त्यांनी अनेक प्रकारच्या नोकऱ्या देखील केल्या. २१व्या वर्षी त्यांनी दिल्लीत निर्यात व्यवसाय सुरू केला. ते हस्तकलेतून तयार झालेल्या वस्तू जर्मनीला निर्यात करायचे. पण तो व्यवसाय अचानक ठप्प झाला. व्यवसायात सतत तोटा आणि त्रास सहन केल्यानंतर ते पूर्णपणे खचून गेले होते. यानंतर ते पंडित होण्यासाठी ऋषिकेशला गेले.
पंडित बनायला गेलेल्या कैलाश खेर यांचे साथीदार त्यांच्यापेक्षा खूपच लहान होते. त्यांचे विचारही सहकाऱ्यांशी जुळत नव्हते. त्यामुळे ते मनातून निराश झाले होते. प्रत्येक गोष्टीत ते सतत अपयशी ठरत होते, त्यामुळे एके दिवशी त्यांनी गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पण, त्यावेळी गंगा घाटावर उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्याला वाचवले. कैलाश खेर यांना वाचवणाऱ्या व्यक्तीने त्यांना विचारले की, पोहता येत नसताना नदीत उडी का मारली? त्यानंतर कैलाशजींनी आपले दु:ख त्या व्यक्तीला सांगितले. हे कळताच त्या व्यक्तीने कैलाश खेर यांच्या डोक्यात टपली मारली. त्या टपलीने कैलाश खेर यांना जीवनाचे मूल्य शिकवले.