छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमध्ये अग्रस्थानी असलेली मालिका म्हणजे ‘ठरलं तर मग.’ या मालिकेत अभिनेत्री जुई गडकरी सायली हे महत्त्वाचे पात्र साकारताना दिसत आहे. या मालिकेच्या माध्यमातून जुईने बऱ्याच वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेच्या सहाय्यक दिग्दर्शकाचा अपघात झाल्याची माहिती तिने दिली होती. आता त्याचे निधन झाल्याची दु:खद बातमी जुईने दिली आहे.
‘ठरलं तर मग’ मालिकेच्या सेटवर गौरव काशिदे हा सहाय्याक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याचा ९ जूनला वांद्रे येथे अपघात झाला होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून तो कोमामध्ये होता. त्याच्यावर उपचार सुरु होते. सर्वजण तो लवकरात लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थना करत होते. आता जुईने पोस्ट शेअर करत त्याचे निधन झाल्याची माहिती दिली आहे.
वाचा: 'रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही', शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न
“ताई मला कोणी उठवलंच नाही, म्हणून लेट झाला यायला!” हे त्याचं पहिलं वाक्य होतं आमचं युनिट जॅाईन केल्यावर! पहिल्याच दिवशी लेट आला होता तो. मग रुळत गेला हळुहळु. सिनचे que देताना जर ते पात्र पळत असेल तर तो पळून पण दाखवायचा. खूप हुषार होता… मला रोजचे सीन कसे करायचे सांगायचा. हसतमुख होता. मेहनती होता. त्या वयात मुले जशी असतात तसा अल्हड पण होता. मला थोडा घाबरायचा म्हणून “ताईसमोर स्मोक करुन गेलो कि ताई लगेच ओळखते आणि ओरडते. त्यापेक्षा नाही करत स्मोक” असे म्हणून निदान तेवढ्यापूरता तरी टाळायचा. गुणी मुलगा होता.
कसा झाला अपघात हे जुईने पोस्टमध्ये सांगितले
रात्री घरी जाताना आमच्या दुसऱ्या एका महिला एडीला आणि हेअर ड्रेसरला घरी सोडून जायचा. त्या ही रात्री तो त्या दोघींना चारकोपला सोडून पुढे गेला होता. त्या दिवशी नेमकी आमची हेअरड्रेसर चारकोपलाच उतरली. नाहीतर ती रोज त्याच्याबरोबर माहिमपर्यंत जायची. तो तिला घेऊन जायचा म्हणून गाडी सांभाळून चालवायचा.
वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट
त्याचा २४वा वाढदिवस होता १० जूनला. ९ तारखेला त्याच्या बाईकचा वांद्रेमध्ये भीषण अपघात झाला. त्याच्या ब्रेनला जबरदस्त मार लागला होता. त्याला आमच्या सेटवर येऊन जेमतेम महिनाभरच झाला होता. पण सगळ्यांशी त्यानी छान नातं जोडलं होतं. गेले अनेक दिवस तो कोमामध्ये होता आणि काल त्याची मृत्युशी असलेली झुंज अखेर संपली. सेटवर सगळे अजुनही सुन्न आहेत. सगळ्यांना वाटत होतं गैरव परत येईल. गैरव, काल पण तुला कोणीतरी उठवायला हवं होतं रे. तू लेट आला असतास. पण आला तरी असतास.
तुझ्या आतम्याला शांती मिळो हे तरी कसं लिहायचं? त्या आई बाबांचं आज काय झालं असेल याचा विचारही करुशकत नाही असे जुई पोस्टच्या शेवटी म्हणाली आहे.
जुईची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. अनेकांनी कमेंट करत त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.
संबंधित बातम्या