Jui Gadkari Injured:‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सायली आणि अर्जुन प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरी हि प्रेक्षकांची अतिशय लाडकी झाली आहे. जुई गडकरी हिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी देखील चाहते नेहमीच आतुर असतात. मात्र, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर तिचा हॉस्पिटलमधील सलाईन लावलेला फोटो शेअर केला होता. तेव्हापासून तिचे सगळे चाहते खूप काळजीत पडले होते. जुईला नेमकं काय झालं आहे?याबाबत तिचे चाहते सोशल मीडियाद्वारे चिंता व्यक्त करत होते. मात्र, तिला नेमकं काय झालं, याची कल्पना कुणालाच नव्हती. जुईने एक फोटो शेअर करत‘लवकरच काय झालं आहे ते शेअर करेन’असं म्हटलं होतं आणि अखेर तिने तिच्या आजारपणाचं कारण सांगितलं आहे.
जुई गडकरी हिने नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तिला नेमकं काय झालं होतं? ती आजारी कशामुळे होती आणि तिच्यावर कसली शस्त्रक्रिया झाली हे सांगितले आहे. अभिनेत्रीच्या या खुलाशानंतर आता तिच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र, आता तिचे चाहते तिला स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला देखील देत आहेत. चला तर जाणून घेऊया या अभिनेत्रीला नक्की काय झालं होतं.
जुई गडकरी हिने तिच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जुई म्हणाली की, ‘हॅलो.. आज बऱ्याच दिवसांनी व्हिडीओ बनवत आहे. गेल्या काही दिवसांपासून लोक मला विचारत होते की तुला काय झालं होतं?तर, जुलै महिन्यामध्ये एका छोट्याशा अपघातामध्ये माझ्या डाव्या कानाचा पडदा फाटला होता आणि त्यावेळी खूप रक्त आलं होतं. मला खूपच त्रास होत होता आणि त्यामुळे मला नीट ऐकूसुद्धा येत नव्हतं. कान बरा होईल थोडे दिवसांनी म्हणून आम्ही वाट बघत होतो. कारण कानाचा पडदा आपोआप बरा होतो. आम्ही खूप वाट बघितली पण, तो काही बरा झाला नाही. त्यामुळे मग सर्जरी करण्याचं ठरवलं.
जुई गडकरी म्हणाली, ‘यामुळे गेले काही दिवस तुम्ही माझ्या कानामध्ये जो कापूस बघत होता, तो त्यासाठीच होता. यासाठी आम्ही मालिकेचे कथानक थोडे सांभाळून घेतले आणि मग मी पाच दिवसांसाठी सुट्टीवर गेले. पाच दिवसांनी मी कामावर परत आले, तेव्हा सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं. आमच्या टीममधील आणखी काही लोक आजारी होते. मग त्यामुळे आम्ही आधीच काही एपिसोड करून ठेवेले त्यामुळे मालिकेत मला प्रियाने ढकलून दिल्याचं कथानक आलं आहे. माझ्या कानाच्या या शस्त्रक्रियेदरम्यान सगळ्यांनीच खूप सांभाळून घेतलं.’