मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jui Gadkari: मालिकाविश्व गाजवणारी जुई गडकरी आहे '11th Fail', स्वत: केला खुलासा

Jui Gadkari: मालिकाविश्व गाजवणारी जुई गडकरी आहे '11th Fail', स्वत: केला खुलासा

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 05, 2024 09:19 AM IST

Jui Gadkari Education: ‘ठरलं तर मग’ या मालिकेमुळे सध्या चर्चेत असणारी अभिनेत्री जुई गडकरी ही ११वीमध्ये नापास झाली होती. तिने कॉलेजच्या आठवणी सांगत हा खुलासा केला आहे.

Jui Gadkari Education
Jui Gadkari Education

Jui Gadkari Personal Life: स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘पुढचं पाऊल’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. तिची कल्याणी ही भूमिका विशेष गाजली होती. या मालिकेनंतर जुईने इंडस्ट्रीमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर आता ती ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकताना दिसत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का आज संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री ११वी मध्ये नापास झाली होती. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तिने याबाबत खुलासा केला आहे.

जुई गडकरीने नुकताच 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने सांगितले की शाळेत असताना तिला अभ्यासाची फारशी आवड नव्हती. त्यामुळे ती गाण्याकडे जास्त लक्ष देत असत. या सगळ्याचा परिणाम तिच्या अभ्यासावर झाला होता. ती ११वीमध्ये नापास झाली होती. “माझे शाळेचे दिवस फार वाईट होते कारण, मला अभ्यास करायला कधीच आवडायचे नाही. मला दहावीत सुद्धा फक्त ५८.८० टक्के गुण मिळाले होते. तेव्हा मला विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याची खूप इच्छा होती. याचे कारण म्हणजे मला व्हेटर्नरी सर्जन व्हायचे होते. माझे प्राणीप्रेम सर्वांनाच माहिती आहे. पण, ५८ टक्क्याला सायन्ससाठी मला कोणत्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नव्हता. शेवटी माझ्या आईने कॉमर्स केलेले म्हणून तिने कॉमर्सला प्रवेश घे असे मला सांगितले” असे जुई म्हणाली.
वाचा: ‘माझी चूक झाली’; अंकिता लोखंडेसोबत घटस्फोटाच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलला विकी जैन!

पुढे ती म्हणाली, “माझ्याकडे गाण्याच्या विविध स्पर्धांची प्रमाणपत्र असल्याने मला सीएचएम कॉलेजमध्ये सांस्कृतिक कोट्यामधून प्रवेश मिळाला. कॉलेजमध्ये मी सांस्कृतिक विभागात सहभाग घेतला होता. कॉलेज सुरू झाल्यावर पुढे वर्षभर माझे गाण्यांचे कार्यक्रम सुरू होते. मी वर्गात तासिकांना अजिबात बसायचे नाही. अकरावीत असताना मला ६७ टक्के मिळाले पण, गणित विषय राहिल्याने मी नापास झाले होते. गणितात १०३ पैकी मला फक्त ३ गुण मिळाले होते. तेव्हा माझ्या एका सरांनी आई-बाबांची समजूत काढली. त्यांनी जुई बाहेरून बारावी पूर्ण करेल असे आश्वासन माझ्या घरी दिले.”

१२वीची परिक्षा बाहेरुन दिली

जुईने ११वीमध्ये नापास झाल्यावर १२वीची परिक्षा बाहेर दिली. याविषयी बोलताना ती म्हणाली, “माझ्या सरांच्या सांगण्यानुसार मी बारावी बाहेरून दिली…अभ्यास करून अगदी छान पास झाले. बारावीचा निकाल लागल्यावर मी माझ्या आवडीच्या शाखेत प्रवेश घेतला ती शाखा म्हणजे बीएमएम (BMM). सगळे आवडीनुसार केल्यामुळे पुढे, पदवीच्या शेवटच्या वर्षात मी विद्यापीठातून पहिली आले होते. आयुष्यात आवडीच्या गोष्टी मिळाल्यावर मी सगळे छान करू शकते. अन्यथा मी खूप हट्टी मुलगी आहे. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मी पदव्युत्तर पदवी परीक्षा पास केली, एमबीए केले पुढे सगळे छान झाले.”

जुई गडकरीच्या कामाविषयी

जुईच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सध्या 'ठरलं तर मग' या मालिकेत दिसत आहे. या मालिकेतील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. या मालिकेने टीआरपी यादीमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. यापूर्वी ती पुढचं पाऊल या मालिकेत दिसली होती. या मालिकेतील कल्याणी प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली.

WhatsApp channel

विभाग