Jui Gadkari Illness : मराठी टेलिव्हिजन विश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीने अभिनय विश्वात खूपच नाव कमावले आहे. तिच्या लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ आणि ‘पुढचं पाऊल’ यांनी प्रेक्षकांचे मन जिंकले आहे, पण यशाच्या शिखरावर पोहोचताना जुईला अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. विशेषतः, ‘पुढचं पाऊल’ नंतर तिने अभिनयातून घेतलेला ब्रेक तिच्या वैयक्तिक जीवनातील मोठ्या संकटाशी लढण्यात गेला.
जुईला या ब्रेक दरम्यान एक गंभीर आजाराला सामोरे जावे लागले. एका मुलाखतीत जुईने सांगितले की, तिच्या मणक्याला डिजनरेट होण्याचे गंभीर समस्या होत्या, आणि पिट्युटरी ग्रंथीमध्ये प्रोलॅक्टिन ट्यूमर विकसित झाला होता. डॉक्टरांनी सांगितले की, या आजारामुळे ती कधीच आई होऊ शकणार नाही. वयाच्या केवळ २७व्या वर्षी तिच्या जीवनावर आलेले हे संकट खूप गंभीर होते. तिच्या कुटुंबीयांना तर असे वाटत होते की, जुई कोमात जाऊ शकते. हा काळ तिच्या जवळच्या लोकांसाठी आणि तिच्यासाठीही अत्यंत भयाण आणि वेदनादायक होता.
जुईच्या वडिलांनी या संकटाच्या काळात जो संयम आणि धैर्य दाखवले, तो खरोखरच प्रेरणादायक आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले की, ‘आमच्या घरात कधीही एकमेकांपासून काही लपवले गेले नाही. आम्हाला माहीत होते की, काय चालले आहे, आणि तिलाही परिस्थितीची जाणीव होती. जे लपवून ठेवायचे होते, ते लपवून ठेवले नाही. शेवटी, जे काही होईल ते स्वीकारायचं आणि पुढे काय होते ते पाहायचं, असे आम्ही ठरवले.’ त्यांना विश्वास होता की, समस्या येतात, पण त्यांचा सामना सकारात्मकतेने करणे महत्त्वाचे आहे. त्यांचे म्हणणे होते की, जर आम्हीच तणावाखाली गेलो असतो, तर जुईचे काय झाले असते? तिने स्वतःला सावरले, प्रचंड मेहनत घेतली, आणि आज ती पुन्हा उभी आहे.
जुईच्या आईसाठी हा काळ आणखी कठीण होता. जुईची आई म्हणाली की, ‘त्या वेळी तिचे वडील घरात नव्हते. एका मित्राच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केलं. मी पूर्णपणे कोलमडून गेले होते, काहीच समजत नव्हते. तो क्षण मी कधीही विसरू शकणार नाही. देवाचे आभार, आमचे दत्तगुरू पाठीशी होते, आणि त्यांच्यामुळेच जुई आज आपल्यासमोर आहे.’
या कठीण प्रसंगामुळे जुईला जीवनातील खरे महत्त्व समजले. ती त्या रात्री आपल्या मित्र-मैत्रिणींना सोबत गप्पा मारून झोपी गेली होती, पण सकाळी उठल्यावर ती थेट रुग्णालयातील सीसीयूमध्ये होती. ही अकल्पित परिस्थिती तिला एक धक्का देऊन गेली होती. पण, जुईने आपल्या सकारात्मक दृष्टीकोनाने आणि कुटुंबाच्या समर्थनाने या संकटावर मात केली. आज जुई गडकरी तिच्या संघर्षामुळेच अभिनय क्षेत्रात पुन्हा यशस्वीपणे उभी आहे, आणि तिची ही कहाणी प्रत्येकाला प्रेरणा देते.
संबंधित बातम्या