Johnny Walker : बस कंडक्टर ‘असा’ बनला अभिनेता; जॉनी वॉकरबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Johnny Walker : बस कंडक्टर ‘असा’ बनला अभिनेता; जॉनी वॉकरबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Johnny Walker : बस कंडक्टर ‘असा’ बनला अभिनेता; जॉनी वॉकरबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत का?

Nov 11, 2022 10:49 AM IST

Johnny Walker:जॉनी वॉकर यांचे खरे नाव बदरुद्दीन जमालुद्दीन काझी होते. मात्र, मनोरंजन विश्वात आल्यावर त्यांनी जॉनी वॉकर हे नाव धारण केले.

Johnny Walker
Johnny Walker

Johnny Walker: आपल्या विनोदी अभिनयाने खळखळवून हसवणारे अभिनेते जॉनी वॉकर यांचा आज (११ नोव्हेंबर) स्मृतिदिन. त्यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९२६ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. जॉनी वॉकर यांचे खरे नाव बदरुद्दीन जमालुद्दीन काझी होते. मात्र, मनोरंजन विश्वात आल्यावर त्यांनी जॉनी वॉकर हे नाव धारण केले आणि पुढे ते याच नावाने ओळखले गेले. आपल्या अभिनयाच्या बळावर त्यांनी लाखो रसिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. पण, त्यांचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता.  

जॉनी यांचे बालपण अत्यंत खडतर होते. तब्बल १० भावंडांमध्ये ते दुसरे होते. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. मात्र, वडिलांची नोकरी गेल्यानंतर १०-१२ लोकांचे कुटुंब सांभाळणे आणि त्यांचा उदरनिर्वाह करणे अतिशय कठीण झाले होते. गिरणी बंद पडल्याने घरखर्चात अडचणी येत होत्या. त्यामुळे वडिलांसोबतच घरखर्चाची जबाबदारी जॉनी यांच्या खांद्यावर येऊन पडली. वडिलांना घरखर्चात मदत करण्यासाठी जॉनी यांनी बस कंडक्टरची नोकरी सुरू केली.

बस कंडक्टरची नोकरी मिळाल्याने जॉनी देखील खूप खुश होते. त्यांच्या या आनंदाची दोन मोठी कारणं होती. एक म्हणजे त्यांचा घरखर्च भागणार होता, तर दुसरं म्हणजे नोकरीत असताना त्यांना मुंबईच्या फिल्म स्टुडिओतही फिरता येणार होते. जॉनी यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. आपणही अभिनयक्षेत्रात काम करावे अशी त्यांची इच्छा होती. मात्र, घरच्या जबाबदारीमुळे त्यांनी आपल्या इच्छांना आवर घातला. मात्र, या नोकरीत असतानाच त्यांना एक अशी संधी मिळाली, जिने त्यांचं आयुष्यचं बदलून टाकलं. या नोकरी दरम्यान त्यांना एक छोटीशी भूमिका ऑफर झाली. ‘आखिरी पायमने’ या चित्रपटात छोटी भूमिका करण्याची संधी मिळाली. यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

चित्रपट अभिनेते बलराज साहनी यांच्या सांगण्यावरून जॉनी वॉकर चित्रपट दिग्दर्शक गुरु दत्त यांना भेटायला गेले होते. गुरुदत्त यांनी त्यांना एक लहानशी भूमिका करायला सांगितली. त्यानंतर त्याच्या सांगण्यावरून जॉनी यांनी त्यांच्यासमोर दारुड्यासारखे काम केले. त्यांनी ते इतके सुंदर केले की, गुरुदत्तला शंका आली की ते खरोखर दारू पिऊन तर आले नाहीत ना... आधी गुरू दत्त यांना जॉनी वॉकरचा खूप राग आला होता. पण, जेव्हा त्यांना सत्य समजले, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. या घटनेनंतरच गुरू दत्तने त्यांच्या आवडत्या ब्रँडच्या नावावरून त्यांचे नाव 'जॉनी वॉकर' ठेवले आणि पुढे जाऊन हिंदी मनोरंजन विश्वात त्याच नावाने प्रसिद्ध झाले.

Whats_app_banner