आपल्या फिटनेस आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे जॉन अब्राहम. त्याने आजवर अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. आजवर त्याचे नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले. पण जॉनने कधीही प्रेमाची कबुली दिली नाही. आता एका अभिनेत्रीसोबत तर जॉन एक दोन नाही तर, 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये होता असे म्हटले जात आहे. या अभिनेत्रीने जॉनवर गंभीर आरोप केले होते.
जॉन अब्राहमच्या आयुष्यातील ही अभिनेत्री कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. ही अभिनेत्री दुसरी-तिसरी कोणी नसून अभिनेत्री बिपाशा बासू आहे. तिने अभिनेता करण ग्रोव्हरशी लग्न करण्यापूर्वी डिनो मोरया आणि जॉन अब्राहमला डेट केले आहे. बिपाशाने जॉनला जवळपास १० वर्षे डेट केले होते. पण एकमेकांसोबत पटत नसल्यामुळे त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे जॉनने म्हटले होते. तर बिपाशाने जॉनवर फसवणुकीचा आरोप केला होता.
बिपाशाने एका मुलाखतीमध्ये खासगी आयुष्यावर वक्तव्य केले होते. ‘फसवणूक, अविश्वास आणि छळ या गोष्टींना माझ्या आयुष्यात काही जागा नाही. अशा गोष्टी करण्यांना माफ नाही करु शकत. त्यानंतर मैत्रीसाठी हात पुढे करणं शक्य नाही… मला असं वाटलं त्याने मला सोडून दिले होते. तोपर्यंत मी माझ्या आयुष्यात आनंदी होती. पण आज मला असं वाटतं की, मी किती मुर्ख होती' असे बिपाशा म्हणाली होती.
पुढे बिपाशा म्हणाली, ‘ते ९ वर्ष मी स्वतःला कामापासून दूर ठेवले होते. ऑफर्स स्वीकारल्या नाहीत. ज्या व्यक्तीवर मी प्रेम करत होती, त्या व्यक्तीसाठी मी खंबीर उभी राहिली होती. नातं टिकवून ठेवण्यासाठी मी अधिक वेळ दिला. इतर लोकांना भेटले नाही. त्यानंतर अचानक माझ्या लक्षात आले, ज्या व्यक्तीसाठी मी इतकी मेहनत घेतली, ती व्यक्ती मला सोडून निघून गेली. तेव्हा माझ्यासाठी सर्वकाही संपले होते. हे स्विकारण्यासाठी मला कित्येक महिने लागले.’
वाचा: 'या' मराठमोळ्या मॉडेलच्या न्यूड पोजने ९०च्या दशकात उडवली होती खळबळ, १४ वर्षे चालला खटला
‘त्याने मला सोडून दिले. मी प्रचंड वेदना सहन केल्या आहेत. मी ओरडत राहिली… एकटी राहू लागली. यामुळे मला प्रचंड दुःख झाले होते’ असं बिपाशा बासू म्हणाली होती. जॉन आणि बिपाशा त्यांच्या आयुष्यात पुढे गेले असले तरी कायम त्यांच्या नात्यामुळे चर्चेत असतात. बिपाशाने करण ग्रोवरशी लग्न केले आहे तर जॉनने प्रिया रूंचालशी लग्न केले.
संबंधित बातम्या