मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा मोठ्या पडद्यावर अवतरणार; 'जिऊ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

राजमाता जिजाऊ यांची यशोगाथा मोठ्या पडद्यावर अवतरणार; 'जिऊ' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 13, 2023 08:13 AM IST

Jiu Swarajya Kanika : राजमाता जिजाबाईंच्या ४२५व्या जयंतीचे औचित्य साधत नुकतेच ‘जिऊ’ या चित्रपटाचे पोस्टर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

Jiu Marathi Movie
Jiu Marathi Movie

Jiu Swarajya Kanika : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई. छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम करण्यात राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. कुशाग्र बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, कुशल राजनीती, संघटनशक्ती आणि कुटुंबवत्सल जिजाऊ केवळ शिवरायांच्याच नाही, तर संपूर्ण स्वराज्याच्या माता होत्या. प्रसंगी कठोर होऊन शत्रूस जेरीस आणणाऱ्या या स्वराज्य कनिकेच्या कर्तुत्वाला हजारो-लाखो तोफांची सलामी दिली तरी कमीच आहे. आता त्यांची हीच यशोगाथा ‘जिऊ’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे.

शिवरायांच्या संगोपनात तसूभरही कसर न सोडणाऱ्या 'जिजाऊ' कशा होत्या या बद्दलची माहिती तशी कमीच.. पण त्यांचं कार्य जगासमोर आलं पाहिजे, खरंतर ती काळाची गरजच आहे. स्त्री अबला नसून सबला आहे असे दाखवून देणाऱ्या या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट नसता आला तरच नवल. राजमाता जिजाबाईंच्या ४२५व्या जयंतीचे औचित्य साधत नुकतेच ‘जिऊ’ या चित्रपटाचे पोस्टर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.

'स्वराज्य कनिका -जिऊ' चित्रपटाचे दुसरे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले असून, नवोदित अभिनेत्री ईश्वरी देशपांडे या चित्रपटात जिजाऊंच्या भूमिकेत पाहायला मिळतेय. या चित्रपटात ईश्वरी जिजाऊंच्या बालपणीची भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. ईश्वरी देशपांडे हा एक नवीन चेहरा सिनेविश्वात पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे. आता ईश्वरीसह या चित्रपटात आणखी कोणते कलाकार दिसणार, हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्ये जगदंबेचा आशीर्वाद मिळत असून जिजाऊंच्या नजरेतील तीक्ष्णता अचूक हेरली जातेय.

या चित्रपटाच्या निर्मात्या अनुजा देशपांडे यांचा 'स्वराज्य कनिका-जिऊ' हा पहिलाच चित्रपट असून या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तसेच चित्रपटाची कथा, संकल्पना ही अनुजा देशपांडे यांचीच आहे. तब्ब्ल चार वर्ष केवळ राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास अभ्यासत 'स्वराज्य कनिका-जिऊ'ची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं आहे. १२ जानेवारी २०२४ला हा चित्रपट प्रत्येक मायबाप प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज होणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग