Jigra Movie Review In Marathi : बॉलिवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट ही आई झाल्यानंतर आता पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर परतली आहे. तिच्या नव्या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. अभिनेत्रीचा ‘जिगरा’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात एक वेगळे आणि हटके कथा पाहायला मिळणार आहे. भावासाठी लढणारी बहीण या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, आलियाचा हा चित्रपट नक्की कसा आहे, तिची भूमिका यात कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चित्रपट बघण्याचा विचार करत असाल, तर हा रिव्ह्यू नक्की वाचा.
आलिया भट्टच्या ‘जिगरा’ या चित्रपटाची कथा भाऊ आणि बहिणीच्या नात्यावर आधारित आहे. या चित्रपटात आलिया भट्ट आणि वेदांग रैना यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. आलिया भट्ट वेदांग रैना याच्या बहिणीची भूमिका साकारताना दिसली आहे. चित्रपटात वेदांग रैना याने साकारलेल्या पात्राचे नाव अंकुल आहे, तर आलियाच्या पात्राचे नाव सत्या आहे. वेदांग रैनाने साकारलेला अंकुश हा आलिया भट्टने साकारलेल्या सत्याचा छोटा भाऊ आहे. सत्याचा भाऊ अंकुल याला एका खोट्या प्रकरणात मुद्दामहून गोवण्यात आलं आहे. इतकंच नाही तर, हा न केलेला गुन्हा देखील कबूल करण्यासाठी त्याच्यावर पोलिसांकडून सतत दबाव टाकला जात आहे. त्याला तुरुंगात डांबून पोलीस खूप अत्याचार करतात. त्याला खूप छळलं जातं.
अंकुल या सगळ्या गोष्टी सहन करतो, कारण त्याला माहिती आहे की, त्याची बहीण त्याला काहीच होऊ देणार नाही. दुसरीकडे, सत्या आपल्या भावाला सोडवण्यासाठी काहीही करायला तयार झाली आहे. कुठलंही संकट समोर आलं तरी, त्याला धुडकावून लावून आपल्या भावाला म्हणजेच अंकुलला तुरुंगातून सुखरूप बाहेर काढायचं, हे सत्याने आधीच ठरवले आहे. आता अंकुलला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी सत्या काय करणार, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट एकदा नक्की पहावा लागेल.
‘जिगरा’ हा बहुप्रतीक्षित चित्रपट असला, तरी या चित्रपटाची फारशी चर्चा पाहायला मिळत नाहीये. तर, या चित्रपटात आलिया आणी वेदांग प्रेक्षकांचे फारसे मनोरंजन करू शकले नाहीत. यावेळी आलिया भट्टचा चित्रपट निवडण्याचा अंदाज काहीसा चुकलेला दिसत आहे. 'जिगरा' हा चित्रपट अनेक ठिकाणी चुकल्यासारखा वाटत आहे. 'जिगरा' हा चित्रपट आलिया भट्टच्या करिअरमधील सर्वात कमकुवत चित्रपट ठरू शकतो. या चित्रपटापूर्वी आलिया भट्ट अनेक धमाकेदार चित्रपटांमध्ये दिसली होती. मात्र, या चित्रपटात तिची जादू चालली नाहीये.
आलिया भट्टचा हा सर्वात कमकुवत कथानक असलेला आणि कंटाळवाणा चित्रपट आहे. आलियाने या चित्रपटात खूपच ओव्हरॲक्टिंग केली आहे. ‘जिगरा’ हा चित्रपट हॉलिवूड चित्रपटांच्या शैलीत बनवला गेला आहे, ज्यामध्ये कथानकला फारसे महत्त्व देण्यात आलेले नाही. या चित्रपटातून प्रेक्षकांचे फारसे मनोरंजन होत नाही. हा चित्रपट एका विशिष्ट वर्गासाठी बनवला गेला आहे, असे वाटते. हा चित्रपट हिंदीसोबतच साऊथच्या इतर भाषांमध्ये देखील रिलीज करण्यात आला आहे.