Jhimma 2: अॅनिमल आणि सॅम बहादुरला 'झिम्मा २'ची टक्कर, तिसऱ्या आठवड्यात कमावले इतके कोटी
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Jhimma 2: अॅनिमल आणि सॅम बहादुरला 'झिम्मा २'ची टक्कर, तिसऱ्या आठवड्यात कमावले इतके कोटी

Jhimma 2: अॅनिमल आणि सॅम बहादुरला 'झिम्मा २'ची टक्कर, तिसऱ्या आठवड्यात कमावले इतके कोटी

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Dec 09, 2023 09:40 AM IST

jhimma 2 Box Office Collection: तिसऱ्या आठवड्यात देखील 'झिम्मा २' हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.

jhimma 2 Box Office
jhimma 2 Box Office

बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट 'अॅनिमल' आणि 'सॅम बहादुर' नुकताच प्रदर्शित झाले आहेत. हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत असताना हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा २' या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही 'झिम्मा २'ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहेत. एकदंरच हसताहसता डोळ्यांत चटकन पाणी आणणारा आणि रडतारडता मनमुराद हसवणारा 'झिम्मा २' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय हे नक्की.

२४ नोव्हेंबरला प्रदर्शित झालेल्या 'झिम्मा २' या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या आठवड्यात १० कोटी ३५ लाख रुपये कमावले आहेत. या यशाचा आनंद सर्वजण घेताना दिसत आहेत.
वाचा: 'अ‍ॅनिमल'चा डंका! सातव्या दिवशीच्या कमाईचा आकडा पाहिलात का?

दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘झिम्मा’ हा चित्रपट एक वर्षापूर्वी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचा हटके विषय, तगडी स्टारकास्ट या सर्वामुळे चित्रपटाने बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. त्यापाठोपाठ 'झिम्मा २' हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटात सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, "खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नाही. प्रेक्षक आपले खास दिवस 'झिम्मा २'बघून साजरे करत आहेत. २-३ वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान वाटतेय. खरंतर 'झिम्मा २'ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण 'झिम्मा'ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते. शिवाय 'झिम्मा २' सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते. परंतु आता दोन आठवडे झाले आहेत. प्रेक्षक आजही 'झिम्मा २'ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत 'झिम्मा २' स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे. आपला चित्रपट यशस्वी दुसरा आठवड्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहोत. शोजही वाढले आहेत. त्यामुळे आशा आहे, हा आठवडाही असाच हाऊसफुल्ल जाईल. अर्थात हे सगळे यश माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आनंद एल. राय, क्षिती जोग आणि जिओ स्टुडिओजची साथ लाभल्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो."

Whats_app_banner