Taarak Mehta ka Ooltah Chashmah Viral Video: छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांसाठी खूप खास आणि जवळची आहेत. यातही बबिता जी आणि जेठालाल यांच्या मैत्रीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत अभिनेते दिलीप जोशी हे ‘जेठालाल’ तर, अभिनेत्री मुनमुन दत्ता ‘बबिता जी’ ही पात्र साकारत आहेत. दोन्ही कलाकार कुठेही स्पॉट झाले तरी त्यांना एकमेकांबद्दल प्रश्न केले जातात. असाच किस्सा आता अभिनेते दिलीप जोशी यांच्यासोबत घडला आहे.
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याची मुलगी आयरा खान हिचा विवाह सोहळा नुकताच पार पडला होता. यानंतर आता मुंबईत एका मोठ्या रिसेप्शन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडलेल्या या रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम ‘जेठालाल’ म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी यांनी देखील आपल्या पत्नीसोबत आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती. यावेळी दिलीप जोशी यांनी पत्नीसोबत एन्ट्री घेताच पापाराझींनी त्यांना प्रश्न विचारण्यास सुरुवात केली.
अभिनेता दिलीप जोशी यांनी या रिसेप्शन सोहळ्यात पत्नीसोबत एन्ट्री घेतली होती. मात्र, दिलीप जोशी यांना बघताच पापाराझींनी त्यांना प्रश्न केला की, ‘जेठाजी तुम्ही इकडे तर बबिता जी कुठे आहेत?’ पापाराझींचा हा सवाल ऐकून दिलीप जोशी यांच्या पत्नीला देखील हसू आलं. तर, दिलीप जोशी यांनी देखील पत्रकारांच्या प्रश्नाला लगेच उत्तर दिलं. ‘बबिता जी कुठे आहेत?’ हा प्रश्न ऐकताच दिलीप जोशी म्हणाले की, ‘त्या घरी आहेत आणि कुठे जाणार...’ या उत्तराने उपस्थित सगळ्यांमध्येच जोरदार हशा पिकला होता. त्यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या मुंबईतील रिसेप्शन सोहळ्याला दिलीप जोशी सपत्नीक उपस्थित होते. यावेळी दिलीप जोशी यांनी काळ्या रंगाचा इंडो-वेस्टर्न शेरवानी परिधान केला होता. तर, त्यांच्या पत्नीने देखील मॅचिंग काळ्या रंगाचा सलवार सूट ड्रेस परिधान केला होता. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रिसेप्शन सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती.