Jaya Prada Case: रामपूर पोलीस गेल्या बऱ्याच दिवसांपासून बॉलिवूड स्टार जया प्रदा यांचा शोध घेत आहेत. रामपूरच्या खासदार-आमदार न्यायालयाने अभिनेत्रीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. पोलिसांनी अभिनेत्रीविरोधात वॉरंट जारी करण्याची ही सातवी वेळ आहे. रामपूरच्या न्यायालयाने पोलिसांना अभिनेत्री-राजकारणी जया प्रदा यांना अटक करून २७ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत. वरिष्ठ अभियोग अधिकारी अमरनाथ तिवारी यांनी याबद्दल सांगिताना म्हटले की, जया प्रदा यांच्याविरुद्ध सातव्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी झाल्यानंतरही, त्या सोमवारी सुनावणीसाठी न्यायालयात पोहोचल्या नाहीत.
जया प्रदा यांना अटक करून त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी विशेष पथक तयार करण्याचे आदेश न्यायालयाने पोलीस आयुक्तांना दिले आहेत. आचारसंहिता भंगाच्या दोन प्रकरणांत अभिनेत्री 'फरार' असल्याचे देखील म्हटले जात आहे.
अभिनेत्री जया प्रदा यांनी २०१९मध्ये रामपूरमधून भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीदरम्यान, अभिनेत्रीवर निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. रामपूरच्या खासदार आणि आमदार न्यायालयात हे खटले सुरू आहेत. मात्र, नियोजित तारखांवर सुनावणीसाठी जया प्रदा न्यायालयात हजर राहिल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एकापाठोपाठ एक अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले. मात्र, असे असूनही जया प्रदा न्यायालयात हजर झाल्याच नाहीत.
वरिष्ठ अभियोग अधिकारी अमरनाथ तिवारी यांनी याबद्दल बोलताना सांगितले की, जया प्रदा नाहटा यांच्या विरोधात मध्यप्रदेशात, आमदार विशेष न्यायालयात (दंडाधिकारी खटला) २०१९मध्ये निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी, केमरी पोलिस ठाण्यात एक आणि दुसरा स्वार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील साक्षही पूर्ण झाली असून, केवळ जया प्रदा यांचा जबाब बाकी आहे. न्यायालयाने मागील तारखांना देखील त्यांना अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. १३ फेब्रुवारीची तारीख देखील निश्चित करण्यात आली होती. मात्र, अभिनेत्री यावेळीही कोर्टात पोहोचल्या नाहीत. आता कोर्टाने पुन्हा जया प्रदा विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. आता सुनावणीसाठी पुढील तारीख २७ फेब्रुवारी रोजी ठेवण्यात आली आहे. यावेळी जया प्रदा यांच्या विरोधात सातव्यांदा अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.