Jaya Bachchan Reaction On Mahakumbh : समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांच्या अटकेची मागणी होत आहे. सोमवारी त्यांनी कुंभमेळ्याचे पाणी सर्वाधिक दूषित असल्याचे म्हटले होते. चेंगराचेंगरीत प्राण गमावलेल्यांचे मृतदेह पाण्यात फेकल्याचा दावा त्यांनी केला होता. यानंतर आता विहिंप अर्थात विश्व हिंदू परिषदेने त्याच्या अटकेची मागणी केली आहे. याशिवाय भारतीय जनता पक्षाचे नेते आणि धार्मिक संघटनांनीही बच्चन यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला होता.
विहिंपचे मीडिया प्रभारी शरद शर्मा म्हणाले की, ‘जया बच्चन यांना खोट्या आणि चुकीच्या वक्तव्यांद्वारे खळबळ माजवल्याबद्दल अटक करण्यात यावी. महाकुंभ हा श्रद्धेचा आणि भक्तीचा आधार आहे. जिथे धर्म, कर्म आणि मोक्ष आहे. कोट्यवधी भाविकांच्या भावना त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत.’
संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना सपा खासदार जया बच्चन म्हणालेल्या की, 'सध्या सर्वात दूषित पाणी कुठे आहे? कुंभ मध्ये... त्या ठिकाणी चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह नदीत फेकून दिल्याने पाणी दूषित झाले आहे. खऱ्या मुद्द्यांवर कोणीच बोलत नाहीये'.
महाकुंभात येणाऱ्या लोकांच्या संख्येवरही जया बच्चन यांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले. कुंभमेळ्यात येणाऱ्या सर्वसामान्यांना विशेष सुविधा दिल्या जात नाहीत, त्यांच्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. ‘कोट्यवधी लोक तिथे आले आहेत, असे खोटे बोलले जात आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोक एकाच ठिकाणी कसे जमू शकतात?’, जया बच्चन यांचे हे विधान दिवसभर एक्सवर टॉप ट्रेंडमध्ये होते.
भाजपने हा हिंदू श्रद्धा आणि कुंभमेळ्याचा अपमान असल्याचे म्हटले आहे. अनेक धार्मिक नेते आणि संघटनांनी जया बच्चन यांनी माफी मागावी, अशी मागणी केली असून, जया बच्चन यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे आणि असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. तर, काहींनी जया बच्चन यांना अटक करा, अशी मागणी देखील केली आहे.
यापूर्वी, समाजवादी पक्षाचे (सपा) अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही महाकुंभातील मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृत्यूंवर प्रश्न उपस्थित केले होते. महाकुंभात मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची आकडेवारी सरकारने द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. अखिलेश यादव यांनी योगी आदित्यनाथ सरकारवर निशाणा साधताना जगातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळाव्याचे व्यवस्थापन तातडीने लष्कराकडे सोपवण्याची मागणी केली होती.
संबंधित बातम्या