Jawan Advance Booking: बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘जवान’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करायला सज्ज झाला आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. तर, दुसरीकडे शाहरुख खान या चित्रपटाचे वेगवेगळ्या प्रकारे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ पाहता ‘जवान’ बॉक्स ऑफिसवर त्सुनामीच आणणार आहे, असे म्हणता येईल. ‘जवान’चे अॅडव्हान्स बुकिंग शुक्रवारपासून सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी शाहरुख खानच्या 'जवान'ने त्याच्याच 'पठान' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे. तर, सुरुवातीच्या २४ तासांत ‘जवान’ने ‘पठान’पेक्षा जास्त अॅडव्हान्स बुकिंग मिळवली आहे.
‘जवान’ चित्रपटाच्या हिंदी शोने २डी आणि आयमॅक्स फॉरमॅटमध्ये २.६ लाख तिकिटे विकली गेली आहेत. तर, तमिळ आणि तेलुगू शोची तब्बल ४७०० तिकिटे विकली गेली आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'जवान'ने आतापर्यंत २,७१,१७६ तिकिटे विकली असून, अॅडव्हान्स बुकिंगमधून या चित्रपटाने ८.९८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. मराठा मंदिर सिनेमाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी मीडियाशी संवाद साधताना म्हटले की, ‘गुरुवारचे शो आधीच हाऊसफुल्ल झाले आहेत. त्यामुळे ओपनिंग वीकेंड जबरदस्त कमाई दिसत आहे.’
‘जवान’चे अॅडव्हान्स बुकिंग अतिशय उदंड प्रतिसादात केले जात आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ चित्रपटाची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे गुरुवारचे सगळे शो हाऊसफुल्ल झाले आहेत. तर, वीकेंडही जवळपास हाऊसफुल्ल आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी मुंबईतील वांद्रे भागातील ‘गेट्टी’ आणि ‘गॅलेक्सी’ थिएटरमध्ये मॉर्निंग शोचे बुकिंगही केले आहे. शाहरुखच्या चाहत्यांनी सकाळी ६च्या शोसाठी संपूर्ण थिएटर बुक केले आहे.
साऊथ इंडस्ट्रीतही ‘जवान’विषयी प्रचंड क्रेझ आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे ‘जवान’ चित्रपटाचे दिग्दर्शक आणि या चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट. ‘जवान’मध्ये मुख्य अभिनेत्री नयनतारा आणि विजय सेतुपतीसह अनेक साऊथच्या कलाकारांचा समावेश आहे. आगाऊ बुकिंगमध्ये ‘जवान’ ज्या वेगाने प्रगती करत आहेत, त्यामुळे नवे रेकॉर्ड निर्माण होऊ शकतात. ‘जवान’ या चित्रपटात चाहत्यांना पहिल्यांदाच किंग खान याआधी कधीही न पाहिलेल्या भन्नाट स्टाईलमध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान पहिल्यांदाच पाच वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारणार आहे. ‘जवान’ हा चित्रपट ७ सप्टेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या