Priya Bapat Umesh Kamat Jar Tarchi Goshta Marathi Natak: मराठी मनोरंजन विश्वातील प्रेक्षकांची लाडकी आणि आयडियल जोडी म्हणजे अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट. या जोडीने नेहमीच प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. दोघांनी एकत्र अनेक नाटक, चित्रपट, मालिका आणि वेब सीरिजमध्ये काम केलं आहे. आता त्यांचं ‘जर तरची गोष्ट’ हे नाटक रंगभूमीवर चांगलंच धुमाकूळ घालत आहे. या नाटकाने देखील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाचं कथानक आजच्या नव्या पिढीच्या नातेसंबंधांवर आधारित आहे. खऱ्या आयुष्यात पती पत्नी असणाऱ्या उमेश आणि प्रिया यांनी या नाटकात देखील पती-पत्नीची भूमिका साकारली आहे. मात्र, या नाटकात अनेक ट्वीस्ट देखील आहेत.
‘जर तरची गोष्ट’ या मराठी नाटकाचा प्रयोग आता ‘नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर’ इथे २१ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने एक मराठी कलाकृती इतक्या मोठ्या आणि जादुई मंचावर सादर होणार आहे. यानिमित्ताने हिंदुस्तान टाइम्स मराठीने त्यांच्याशी खास संवाद साधून, गप्पा मारल्या. या मुलाखतीत उमेश आणि प्रिया यांनी एकमेकांचे काहीही खास किस्से देखील शेअर केले. खऱ्या आयुष्यातले पती पत्नी जेव्हा सहकलाकार म्हणून रंगमंचावर एकत्र सादरीकरण करतात, तेव्हा काही अडचणी येतात का? किंवा कधी काही गंमती घडतात का? हा प्रश्न विचारताच अभिनेते उमेश कामत याने आपल्या पत्नीचा म्हणजेच प्रिया बापटचा एक धमाल किस्सा सांगितला.
प्रिया आणि उमेश यांच्या लग्नाला आता अनेक वर्ष लोटली आहेत. त्यांच्यातील हे नातं आता एखाद्या चविष्ट लोणच्यासारखं मुरलं आहे. त्यांच्या या नात्याचं गुपित म्हणजे त्यांची एकमेकांना समजून घेण्याची सवय. परिस्थिती काहीही असो, उमेश आणि प्रिया दोघेही एकमेकांसोबत नेहमीच खंबीरपणे राहतात. नेहमी एकमेकांना खूप समजून घेतात. याचाच फायदा त्यांना नाटकाच्या मंचावर देखील होतो. हा किस्सा सांगताना उमेश कामत म्हणाला की, ‘आम्ही नवरा बायको जेव्हा एकत्र मंचावर काम करतो, तेव्हा दोघांच्या अनेक गोष्टी आम्हाला आधीच माहीत असतात. दोघांचे प्लस मायनस पॉइंट देखील आम्हाला आधीच माहीत असतात. याचा कधी कधी फायदाही होतो आणि कधी तोटाही होतो.’
पुढे उमेश म्हणाला की, ‘प्रिया झुरळाला भयंकर घाबरते. म्हणजे एका खोलीत झुरळ दिसलं तर, ती संपूर्ण घर डोक्यावर घेऊ शकते, इतकी तिला भीती वाटते. आता ही गोष्ट मला आधीपासूनच माहीत होती. ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाच्या नुकत्याच झालेल्या एका प्रयोगादरम्यान प्रिया आणि पल्लवीचा अंक सुरू होता. त्यावेळी मी आणि आशुतोष विंगेत उभे होतो. इतक्यात माझं लक्ष गेलं की, स्टेजवर झुरळ फिरत आहे. मी ते झुरळ पाहिलं आणि विचार केला की, आता जर हे झुरळ प्रियाने बघितलं तर, नाटक इथेच संपवावं लागू शकतं. म्हणून मी आणि आशुतोष आम्ही त्या झुरळाकडे लक्ष ठेवून होतो. आपला अंक सुरू झाला की, पहिला ते झुरळ प्रेक्षकांच्या लक्षात येणार नाही, अशा पद्धतीने चिरडून टाकायचं, हे मी आधीच आशुतोषला सांगितलं होतं. मात्र, ही परिस्थिती प्रियाने खूप छान हाताळली. अजिबात घाबरून न जाता तिने पाय आपटून त्या झुरळाला तिच्या दिशेने येण्यापासून रोखलं आणि अशारीतीने आमचा प्रयोग पूर्ण झाला.’