Satram Rohra Passed Away: 'जय संतोषी माँ' चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा यांचे निधन
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Satram Rohra Passed Away: 'जय संतोषी माँ' चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा यांचे निधन

Satram Rohra Passed Away: 'जय संतोषी माँ' चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा यांचे निधन

Aarti Vilas Borade HT Marathi
Published Jul 20, 2024 09:01 AM IST

Satram Rohra Passed Away: 'जय संतोषी माँ' या सुपरहिट चित्रपटाचे निर्माते सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे. त्यांच्या या चित्रपटाने 'शोले'ला देखील टक्कर दिली होती.

सतराम रोहरा
सतराम रोहरा

Satram Rohra Passed Away: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत वाईट बातमी समोर येत आहे. हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते सतराम रोहरा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ८५व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 'जय संतोषी माँ' या चित्रपटासाठी सतराम हे विशेष ओळखले जायचे. सतराम यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सतराम यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

'जय संतोषी माँ' हा चित्रपट भारतातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक विक्रम आपल्या नावावर केले, जे मोडणे आजही कठीण झाले आहे. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 'शोले' या चित्रपटाला देखील टक्कर दिली होती. आता सतराम यांच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

सतराम यांच्याविषयी

सतराम रोहरा यांचा जन्म १६ जून १९३९ रोजी सिंध, ब्रिटिश भारतात म्हणजे आजच्या पाकिस्तानमध्ये झाला. स्वातंत्र्यानंतर सतराम यांचे संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. यानंतर सतराम यांनी येथूनच आपले शिक्षण पूर्ण केले. निर्माता म्हणून सतराम रोहरा यांचा पहिला चित्रपट म्हणजे १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला 'शेरा डाकू.' यानंतर त्याचा 'रॉकी मेरा नाम' हा चित्रपट आला जो सुपरहिट ठरला. यातूनच त्यांची कारकीर्द पुढे आली. यानंतर त्यांनी 'जय संतोषी मां' हा चित्रपट बनवला, जो ब्लॉकबस्टर ठरला. याशिवाय जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे 'नवाब साहिब', 'घर की लाज', 'करण' आणि 'जय काली' असे अनेक सिनेमे सतराम यांनी केले होते. सतराम रोहरा हे निर्माते तसेच गायक होते. 'झुलेलाल', 'हाल ता भाजी हालू', 'शाल ध्यार ना जमान' आणि 'लाडली' ही गाणी त्यांनी गायली आहेत.
वाचा : 'धर्मवीर २' चित्रपटामध्ये धुरळाच उडणार! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पडद्यावर झळकणार?

शोल चित्रपटाला दिली होती टक्कर

हिंदी सिनेसृष्टीतील 'जय संतोषी मां' आणि 'शोले' हे दोन ब्लॉकबस्टर चित्रपट एकाच दिवशी म्हणजे १५ ऑगस्ट १९७५ रोजी प्रदर्शित झाले. 'जय संतोषी मां'ला पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला, पण 'शोले'ला प्रदर्शनानंतर तीन-चार दिवसांनी प्रतिसाद मिळाला. 'शोले' फ्लॉप ठरेल असं निर्मात्यांना वाटत होतं, पण जेव्हा त्याला वेग आला, तेव्हा त्याला कोणीही रोखू शकलं नाही आणि हा चित्रपट ऐतिहासिक ठरला.

Whats_app_banner