Jagjit Singh Birthday : गझल गायक जगजीत सिंह यांची आज (८ फेब्रुवारी) जयंती आहे. जगजीत सिंह यांनी २०११ मध्ये या जगाचा निरोप घेतला होता. मात्र, त्यांच्या गझलांच्या मध्यमातून ते अजूनही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. जगजित सिंह यांचे आयुष्य चढ-उतारांनी भरलेले होते. जगजीत सिंह यांनी ऑल इंडिया रेडिओमध्ये गाण्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. याआधी त्यांनी पंजाबमधील जालंधर शहरातून शिक्षण घेतले होते. जगजीत सिंह यांनी पंडित छगनलाल शर्मा आणि उस्ताद जमाल खान यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले.
जगजीत सिंह १९६५मध्ये त्यांच्या कुटुंबाला न कळवता मुंबईत आले होते. मुंबईत बराच संघर्ष केल्यानंतर त्यांना गाण्याची संधी मिळाली. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेला त्यांचा 'द अनफॉरगेटेबल्स' हा अल्बम खूप हिट झाला. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी चित्रासोबत लग्न केले होते. चित्राच्या आधीही ते एका मुलीच्या प्रेमात पडले होते. मात्र, त्यांचे हे प्रेम अजिबात फुलले नाही. जगजीत सिंह यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, 'माझे एका मुलीवर प्रेम होते. जालंधरमध्ये शिकत असताना मला त्यावेळी सायकलवरून प्रवास करावा लागत होता. मी माझ्या सायकलची साखळी तुटल्याचे किंवा हवा गेल्याचे कारण सांगून त्या मुलीच्या घरासमोर बसायचो आणि तिच्यावर लक्ष ठेवायचो. नंतर हा ट्रेंड बाईक घेतल्यावरही चालूच राहिला.' पण, त्यांचे हे प्रेम सफल झाले नाही.
जगजीत सिंह यांनी गायिका चित्रासोबत लग्न करण्यासाठी त्यांच्या पहिल्या पतीची परवानगी मागितली होती. चित्रा यांचे आधीच देबू प्रसाद दत्ताशी लग्न झाले होते. त्यांना मोना नावाची एक मुलगीही होती. चित्रा यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा त्यांनी पहिल्यांदा जगजीत सिंह यांचा आवाज ऐकला, तेव्हा त्यांना तो आवडला नव्हता. मात्र नंतर, त्या त्यांच्या आवाजाच्या वेड्या झाल्या.
चित्रा त्यांच्या पहिल्या पतीपासून वेगळ्या झाल्या होत्या. मात्र, त्या दोघांचा घटस्फोट झाला नव्हता. या काळात जगजीत सिंह यांनी त्यांना लग्नाचा प्रस्ताव दिला. यावर चित्रा यांनी उत्तर दिले की, मी आधीच विवाहित आहे. १९७० मध्ये, जगजीत सिंह यांनी चित्रा यांच्या पहिल्या पतीची भेट घेतली आणि त्यांच्याशी लग्न करण्याची परवानगी मागितली. पुढे दोघांचे लग्न झाले आणि त्यांना विवेक नावाचा एक मुलगा देखील झाला. मात्र, त्यांच्या मुलाचे १९९०मध्ये एका कार अपघातात निधन झाले.
संबंधित बातम्या