बॉलिवूडमधील अतिशय हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'जब वी मेट.' या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूरच्या आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिव्या सेठच्या मुलीचे निधन झाले आहे. दिव्याच्या मुलीचे नाव मिहिका शाह. मिहिकाने सोमवारी अखेरचा श्वास घेतला. दिव्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मंगळवारी मुलीच्या निधनाची माहिती दिली. ही पोस्ट पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
दिव्या सेठने फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली आहे. 'मला तुम्हाला सांगताना अतिशय दु:ख होत आहे की माझी मुलगी मिहिका शाहचे निधन झाले आहे. ५ ऑगस्ट २०२४ रोजी ती आम्हा सर्वांना सोडून गेली' या आशयाची पोस्ट दिव्याने केली आहे. मिहिका ही गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. तिच्यावर उपचार सुरु होते. पण सोमवारी उपचारादरम्यान तिने निधन झाले. मिहिका ही ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री सुषमा सेठ यांची नात होती. दिव्या सेठने जब वी मेटसह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
काही दिवसांपूर्वी दिव्या सेठने मुलगी मिहिका आणि आई सुषमा यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये तिने घरातील तीन पिढ्या दाखवल्या होत्या. हा फोटो शेअर करत दिव्याने 'डीएनए ही खरी रिअॅलिटी आहे. बाकी इतर गोष्टींसाठी प्रचंड मेहनत करावी लागते' या आशयाचे कॅप्शन दिले होते. हा फोटो पोस्ट केल्यानंतर काही दिवसात मिहिकाचे निधन झाले.
वाचा: हे असलं घरात पाहण्यापेक्षा अडल्ट सिनेमा पाहिला असता; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’वर नेटकरी संतापले
दिव्या सेठच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ती अनेक चित्रपटांमध्ये झळकली होती. 'जब वी मेट', 'दिल धडकने दो', 'आर्टिकल ३७०' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. याशिवाय तिने 'बनेगी अपनी बात', 'देख भाई देख' सारख्या काही टीव्ही मालिकांमध्येही काम केले आहे. तसेच दिव्याची आई सुषमा सेठ यांनी हम लोग सारख्या टीव्ही मालिकांमध्येच काम केले आहे. इतकच नव्हे तर 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो' सारख्या चित्रपटांमध्येही त्या दिसल्या होत्या.