Jaane Jaan Review: सध्या बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना सध्या डिजिटल विश्वाची वाट खुणावत आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर-खान हिने देखील ओटीटी विश्वात पदार्पण केले आहे. नुकताच तिचा ‘जाने जान’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. तिच्या वाढदिवसाचं निमित्त साधून हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. अनेकांनी पहिल्याच दिवशी हा चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला आहे. ‘जाने जान’ या चित्रपटात करीना कपूर-खानसोबत अभिनेता जयदीप अहलावत आणि विजय वर्मा देखील झळकले आहेत. तुम्ही देखील या विकेंडला ‘जाने जान’ हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट...
‘जाने जान’ हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री आहे. आता हा चित्रपट चांगलाच चर्चेत आला आहे. या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या एका दिवसांत वाहवा मिळवली आहे. या चित्रपटाची कथा आहे माया डिसुजा नावाच्या एका महिलेची, जी स्वतःच्या भूतकाळापासून पळ काढत आहे. माया डिसुझा हिला तारा नावाची एक मुलगी देखील आहे, जिला एक चांगले भविष्य मिळावे म्हणून माया खूप मेहनत घेत आहे. मात्र, याच दरम्यान मायाच्या हातून एक खून होतो. माया स्वतःचा पती इन्स्पेक्टर अजित म्हात्रेचा जीव घेते. मायाच्या यातून एक खून झाला आहे, याची माहिती तिच्या घराशेजारी राहणाऱ्या शिक्षक नरेनला मिळते. नरेन मायाला मदत करण्याचा निर्णय घेतो.
आता या खुनाचा तपास सुरू होतो, आणि कथेत पोलीस ऑफिसर करण आनंद अर्थात विजय वर्माची एन्ट्री होते. तपासासाठी मायाच्या घरी पोहोचलेल्या करणला तिथे आपला जुना वर्ग मित्र भेटतो. त्याचा हा वर्ग मित्र दुसरा-तिसरा कुणी नसून, मायाचा शेजारी नरेन आहे. आता करण या खुनाचा तपास करत असताना त्याच्या हाती पुरावे लागणार का? नरेन करणला सत्य सांगेल की मायाचा बचाव करेल? मायाने अजितचा खून का केलाय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागणार आहे.
या चित्रपटात सगळेच मातब्बर कलाकार आहेत. करीना कपूर हिने या चित्रपटात खूप चांगला अभिनय केला आहे. मात्र, तिच्या भूमिकेला आणखी खुलवता आले असते. या चित्रपटाचे कथानक हे करीना साकारत असलेल्या ‘माया’च्या पात्राभोवती फिरणारे आहे. करीनाला स्वतःला एका नव्या भूमिकेत सादर करण्याची ही उत्तम संधी होती. मात्र, करीनाला विशेष काही करता आलेले नाही. मात्र, ती तिच्या भूमिकेत लक्षात राहते. तर, दुसरीकडे विजय वर्मा देखील फारसा या पात्रात शिरलेला दिसला नाही. विजय आणि करीनाची जोडी पडद्यावर काही अंशी फोल ठरली आहे. मात्र, या सगळ्यात प्रेक्षकांच्या लक्षात राहतो तो अभिनेता जयदीप अहलावत. या चित्रपटात दमदार अभिनय करून जयदीपने पुन्हा एकदा त्याचं कसब सिद्ध केलं आहे.
चित्रपटात थ्रिल आणण्याचा पूरेपर प्रयत्न केला गेला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न फसला आहे. सुरुवातीला कथानक फारच धीम्या गतीने सुरू राहते. तर, चित्रपटात जिथे थ्रिल आणि सस्पेन्स सुरू होतो, तिथेच कथानक इतके वेगाने पुढे सरकते की चित्रपट संपून जातो. एकंदरीत ‘जाने जान’ हा चित्रपट काहीसा निराशाजनक ठरला आहे.
अभिनेता जयदीप अहलावत याच्या दमदार अभिनयासाठी हा चित्रपट एकदा पाहायलाच हवा. जयदीप अहलावतने या चित्रपटाला चार चांद लावले आहेत. मर्डर मिस्ट्रीचा जॉनर डोक्यात न ठेवता घरबसल्या एकदा हा चित्रपट नक्कीच पाहू शकता.
चित्रपट : जाने जान
कलाकार : करीना कपूर खान, जयदीप अहलावत, विजय वर्मा, सौरभ सचदेवा, नायशा खन्ना, करमा टकामा आणि लिन लैशराम
लेखक : सुजॉय घोष और राज वसंत
दिग्दर्शक : सुजॉय घोष