शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात आणखी दोन मजल्याची पडणार भर; गौरी खानचा राज्य सरकारकडे अर्ज
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात आणखी दोन मजल्याची पडणार भर; गौरी खानचा राज्य सरकारकडे अर्ज

शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्यात आणखी दोन मजल्याची पडणार भर; गौरी खानचा राज्य सरकारकडे अर्ज

Aarti Vilas Borade HT Marathi
Dec 11, 2024 05:45 PM IST

शाहरुख खानचा मन्नत बंगला सहा मजल्यांचा आहे. त्यात आणखी दोन मजले वाढवण्यासाठी शाहरुखची पत्नी गौरी खानने अर्ज केला आहे.

Mannat mansion (Hindustan Times)
Mannat mansion (Hindustan Times)

बॉलिवूडचा किंग म्हणून अभिनेता खान शाहरुख ओळखला जातो. शाहरुख हा त्याच्या चित्रपटांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. त्याचे राहते घर म्हणजे वांद्रे येथील 'मन्नत' बंगला हा मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरला आहे. हा बंगला २०१९.३८ चौरस मीटरमध्ये वसलेला आहे. पण आता शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी खान यांचा हा बंगला आणखी आलिशान बनवण्याकडे कल आहे. सहा मजली असलेली ही इमारत आणखी दोन मजल्यांनी वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी गौरीने कोस्टल रोड ऑथेरिटीकडे अर्ज भरला आहे.

गौरी खानने केला अर्ज

'हिंदुस्तान टाइम्स'ला मिळालेल्या माहितीनुसार, गौरी खानने ९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अॅथॉरिटीकडे (एमसीझेडएमए) अर्ज दाखल करून आणखी दोन अतिरिक्त मजले वाढवण्याची मागणी केली आहे. म्हणजे ६१६.०२ क्वेअर फूट वाढवण्याची मागणी केली आहे. गौरी खानच्या अर्जावर सचिव प्रवीण दराडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती बुधवारी निर्णय घेणार आहे.

दोन मजले वाढवण्यासाठी केला अर्ज

गौरी खानने केलेल्या अर्जामध्ये मन्नत या बंगल्यामध्ये सातवा आणि आठवा मजला वाढवण्यासाठी अर्ज केला आहे. सध्या मन्नत बंगल्यात तळमजला आणि त्यावर सहा मजले आहेत. गौरी खानला आणखी दोन म्हणजेच सातवा व आठवा मजला वाढवायचा आहे. कोस्टल झोन प्राधिकरणाकडे सादर केलेल्या कागदपत्रांनुसार यासाठी जवळपास २५ कोटी रुपये खर्च येणार आहे.
वाचा: सहकलाकाराचा अपमान करायचे; अमोल पालेकर यांनी सांगितले राजेश खन्ना यांच्या तऱ्हेवाईक वागण्याचे किस्से

२००१मध्ये खरेदी केला बंगला

शाहरुख खानने बँडस्टँड येथे येस बॉस चित्रपटासाठी एक दृश्य चित्रित केले होते. दरम्यान, नरिमन के दुबाश यांनी बांधलेल्या या हेरिटेज इमारतीबद्दल त्याच्या मनात आकर्षण तयार झाले. त्यानंतर २००१मध्ये शाहरुखने ही मालमत्ता खरेदी केली. या बंगल्याला ग्रेड थ्री हेरिटेज दर्जा असल्याने कोणतेही बदल करण्याची परवानगी मिळाली नव्हती. त्यामुळे आता गौरी खानने या मालमत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी दोन मजले वाढवण्याची परवानगी मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.

Whats_app_banner