Kushal Badrike on Chala Hawa Yeu Dya: मराठी मनोरंजन विश्वात ‘चला हवा येऊ द्या’ या कथाबाह्य कार्यक्रमाने गेली अनेक वर्ष प्रेक्षकांना खळखळवून हसवण्याचे काम केले होते. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. पण आता विनोदवीर कुशल बद्रिके शो सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर स्वत: अभिनेत्याने स्पष्टीकरण दिले आहे.
कुशल बद्रिके लवकरच सोनी टीव्हीवरील ‘मॅडनेस मचायेंगे’ या कार्यक्रमात दिसणार आहे. कुशलने नुकताच याचा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत कुशलचे अभिनंदन केले आहे. तसेच कुशल 'चला हवा येऊ दे' ही मालिका सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. कुशलने शेअर केलेल्या नव्या कार्यक्रमाच्या व्हिडीओवर एका चाहत्याने कमेंट करत “पण, हवा येऊ द्याचं काय होईल? तुम्ही असणार की नाही?” असा प्रश्न विचारला आहे. यावर कुशलने “असणार” असे उत्तर दिले आहे.
वाचा: अंबानींच्या कार्यक्रमाला कंगना गैरहजर, काय आहे कारण?
‘मॅडनेस मचाएंगे इंडिया को हसाएंगे’ हा विनोदी शो वीकएंडला प्रेक्षकांना हास्याचा डोस देण्यासाठी सज्ज झाला आहे. शो मध्ये या आठवड्यात अरबाज खान आणि सोहेल खान यांचे आगमन होणार आहे. ‘मॅडनेस की मालकिन’ हुमा कुरेशीसोबत ते या शोमध्ये सामील होणार आहेत. यावेळी प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि शोचा होस्ट हर्ष गुजराल मोठ्या भावंडांसोबत राहण्यासाठी काय काय करावे लागते हे अधोरेखित करणारा अॅक्ट सादर करणार आहे. विनोदी कलाकार हेमांगी कवी आणि कुशल बद्रिके यांनी आपल्या ‘सायलेंट बायको’ या स्किटद्वारे वैवाहिक जीवनातील चढ उतार विनोदी रीतीने प्रस्तुत करणार आहेत. त्यांच्या या विनोदी बुद्धिमत्तेला खान बंधूंकडून दाद मिळणार आहे.
वाचा: 'कोणतं सरकार आणायचं हे ठरवा', नाना पाटेकरांचे शेतकऱ्यांना आवाहन
‘मॅडनेस मचाएंगे’मधील या भूमिकेबद्दल बोलताना हेमांगी कवी म्हणाली की, ‘‘मॅडनेस मचाएंगे-इंडिया को हसाएंगे!’मध्ये सहभागी होणे हा एक आनंद आहे. अशा उत्कृष्ट विनोदवीरांसोबत काम करणे म्हणजे उत्कंठा आणि सर्जनशीलतेच्या अनुभवाला एक अतिरिक्त पदर जोडल्यासारखे आहे. कुशल बद्रिके सोबत विनोदी स्किट करणे म्हणजे हास्याची दंगलच... पती-पत्नीच्या दैनंदिन जीवनातील विनोद आणि त्यातली धमाल सादर करण्यात आम्हाला इतकी मजा आली की, आम्ही एकत्र केलेला वेडेपणा आणि धमाल प्रेक्षक कधी पाहतात, असे मला झाले आहे.’
वाचा: पंकज त्रिपाठी पकडणार गुन्हेगाराला; विजय वर्मा की करिश्मा कोण आहे दोषी?
याबद्दल बोलताना कुशल बद्रिके म्हणाला की, ‘मॅडनेस मचाएंगेच्या लाँचिंगच्या माध्यमातून टीव्हीच्या पडद्यावर पुन्हा एकदा खरा विनोद परतला आहे. या शोमध्ये गंमतीजंमती, रोस्ट आणि झकास परफॉर्मन्सेसचा समावेश असेल. यामुळे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन होईल, यात शंकाच नाही. प्रेक्षकांना निखळ हास्याच्या या धबधब्यात डुंबवत इतर कॉमेडियन्ससोबत काम करण्याच्या संधीकडे मी मोठ्या आशेने पाहत आहे.’