लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकजण मनोरंजनासाठी कार्टून नेटवर्क पाहात असतात. धकाधकीच्या जीवनात चेहऱ्यावर थोडा आनंद आणण्यासाठी तसेच लहान मुलांचे मनोरंजनासाठी अनेकजण या वाहिनीवरील अॅनिमेटेड कार्टून पाहात असतात. पण आता ही वाहिनी बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हा ट्रेंड नेमका का सुरु झाला आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
सोशल मीडियावर एक्स अकाऊंटवर #RIPCartoonNetwork हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहे. यावरुन ही वाहिनी बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच सोशल मीडियावर अॅनिमेशनचा एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अॅनिमेशन उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकर कपाती करण्यात आलीये, असा दावा करण्यात आला आहे. तसेच या विरोधात उभा राहण्याचे आवाहन देखील केले आहे.
वाचा: पावसावरील 'ती' पोस्ट अभिनेत्री सई ताम्हणकरने केली डिलिट, काय आहे नेमकं कारण?
कार्टून नेटवर्क या वाहिनीवर सुरु असणारे टॉप अँड जेरी, बेन १०, स्कूबी डू बी डू, जॉनी ब्रावो अशा अनेक कार्टुनने बच्चे कंपनीची मने जिंकली. आता सोशल मीडियावर जेव्हा एक व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा या कार्टून नेटवर्क बंद होणार असल्याची चर्चा अनेकांच्या मनाला लागली. हा ट्रेंड दिसू लागल्यावर अनेकांना बालपण आठवल्याचा सीनही पाहायला मिळाला.
सोशल मीडियावर सुरु असलेल्या #RIPCartoonNetworkचा वाहिनीशी कोणताही संबंध नाही. हा हॅशटॅग एका खास मोहिमेसाठी चालवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अॅनिमेशन तयार करणाऱ्या कामगारांना काढून टाकण्यात येत असल्यामुळे त्यांनी एकत्र येऊन ही मोहिम सुरु केली आहे. या मुद्द्याला सर्वस्तरांमधून पांठींबा मिळावा म्हणून #RIPCartoonNetwork सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसत आहे.
वाचा: सलमान खानपासून रणवीर सिंगपर्यंत सेलिब्रिटींनीही अनंत-राधिकाच्या हळदीत केली धमाल
सोशल मीडियावर कार्टून नेटवर्क हे चॅनेल बंद होणार असल्याच्या चर्चांना जोर येताच वाहिनीने एक पोस्ट शेअर केली आहे. "कार्टून चॅनेल अभी जिंदा है" असे त्यांनी म्हटले आहे. तसेच सुरु असणाऱ्या चर्चा या केवळ अफवा आहेत असे देखील म्हटले आहे.'आम्ही केवळ ३० वर्षांचे आहोत. आम्ही कुठेही जाणार नाही. तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही सज्ज आहोत' असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे.