Salman Khan Viral Video : बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर सलमान खानचे काळवीट हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सलमान खानचे वडील सलीम खान यांनी नुकतेच म्हटले आहे की, माझ्या मुलाने काळवीट मारले नाही. तो कधी साधं झुरळही मारत नाहीत. आता सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये सलमान खानने काळवीट मारणारा व्यक्ती मी नसून, काळवीट मारणाऱ्याचे नाव घेऊ शकत नसल्याचे देखील त्याने म्हटले आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये मुलाखतकार सलमान खानला काळवीट शिकारीबद्दल प्रश्न विचारतो. त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना सलमान सलमान खान म्हणाला, ‘ही एक मोठी कथा आहे. काळवीट शिकार मी केली नाही. पण मी कोणाकडेही बोट दाखवणार नाही. त्याला आता काही अर्थ नाही. माझ्याबाबतीत म्हणाल तर, ही केस, तो केस… मी गैरवर्तन करतो, मी लोकांना मारहाण करतो. अरे, तुम्हा लोकांना १% सत्यही माहीत नाही. कारण मला घडाघडा बोलता येत नाही किंवा यापुढेही बोलताही येणार नाही... मी मुद्दाम गप्प आहे.’ सलमान खान पुढे म्हणाला की, ‘हो. मला आता कोणाबद्दलही काही बोलायचे नाही. मला त्याची गरज वाटत नाही आणि मी बोलणारही नाही. मला स्वतःच्या काही मर्यादा आहेत.’
सलमान पुढे म्हणतो की, ‘तुमची स्वतःची निष्ठा आणि प्राधान्य आहे. मी ठरवलं की, मी कोणाबद्दलही काहीही बोलणार नाही. तुम्हाला दुसऱ्या कोणाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. यात आणखी कोणी सामील असेल, तरी मला त्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही.’ यावर मुलाखतकाराने ‘तुझा कर्मावर विश्वास आहे का?,’ असा प्रश्न सलमानला विचारला. यावर सलमान म्हणाला, 'अर्थातच… मला कर्मावर विश्वास आहे. मी काही चुकीचं केलं, तर त्याचा फटका दुसऱ्या दिवशी मला सहन करावा लागतो.
या क्लिपच्या कमेंटमध्ये अनेक प्रतिक्रिया दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, ‘मला खात्री आहे की, तो कोणाला तरी वाचवत आहे.’ काही लोकांनी काळवीट मारणाऱ्या नावांचा अंदाज लावला आहे. काहींनी म्हटलं आहे की, तब्बूने काळवीट मारलं होतं, तर काहींनी सैफ अली खान तिथे होता, असं म्हटलं आहे. एकाने लिहिले की, ‘सलमानने स्वत:वर दोष घेतला. हे जर खरे असेल, तर मी त्यांना सलाम करतो.’ एका युजरने लिहिले की, "मला माहित आहे की सैफ अली खान हा नवाब आहे आणि त्याला शिकारीची आवड आहे.' सलमान खोटं बोलतोय, असंही काहींनी लिहिलं आहे. एखाद्या अभिनेत्रीने काळवीट हत्या केली असावी, असा अनेकांचा अंदाज आहे.
संबंधित बातम्या