'पठाण' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांचा 'फायटर' हा चित्रपट २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन, दीपिका पादूकोण, अनिल कपूर आणि करण सिंह ग्रोवर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. देशाच्या वायू दलाने केलेल्या कामगिरीवर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाची सर्वजण आतुरतेने वाट पाहात होते. आता तीन दिवसात चित्रपटाने छप्पड फाड कमाई केली आहे. लवकरच चित्रपट १०० कोटींचा पल्ला पार करणार आहे.
'फायटर' या चित्रपटाने गुरुवारी प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २२.५० कोटी रुपये कमावले. समोर आलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने दुसऱ्या दिवशी ४०.११ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तिसऱ्या दिवशी चित्रपटाने २८ कोटींहून अधिक कमाई केली आहे. तीन दिवसात चित्रपटाने ८९.५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता लवकरच चित्रपट १०० कोटी रुपयांचा पल्ला पार करणार असल्याचे म्हटले जात आहे.
वाचा: ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात होता बॉबी, धर्मेंद्रने दिला नकार अन्...
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित हा आठवा चित्रपट आहे. व्हिजुअल इफेक्ट्स, कंप्यूटर ग्राफिक्स इमेजिंगमध्ये मास्टर आहे. हृतिक, दीपिका आणि अनिल कपूर यांचा अभिनय पाहण्यासारखा आहे. त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तसेच वायू सेनेने प्रदर्शित केलेले हवाई प्रयोग हे अंगावर शहारे आणणारे आहेत. एकंदरीच चित्रपट चांगला असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, 'फायटर'चे डिजिटल अधिकार नेटफ्लिक्सने खरेदी केले आहेत. ‘फायटर’चे डिजिटल अधिकार कोट्यावधींमध्ये विकले गेले असले, तरी त्यातून निर्मात्यांना नेमके किती पैसे मिळाले? ही माहिती अद्याप समोर आलेली नाही. 'फायटर' थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर ५६ दिवसांनी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.