Sukanya Mone Life Story : मराठीसह हिंदी मनोरंजन विश्व गाजवणाऱ्या आणि मालिका, नाटक, चित्रपट अशा तीनही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक नाव म्हणजे सुकन्या मोने. मराठी रंगभूमीपासून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुकन्या मोने यांनी आजवर अनेक नाटक, चित्रपट आणि मालिका गाजवल्या. सुकन्या मोने यांनी अभिनेते संजय मोने यांच्याशी लग्नगाठ बांधली. आजवरच्या या प्रवासात दोघांनीही एकमेकांना भक्कम साथ दिली. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात सुकन्या मोने अगदी सडपातळ होत्या. मात्र, त्यांच्या आयुष्यात अशी एक घटना घडली, ज्यामुळे सुकन्या यांचं वजन झपाट्याने वाढलं आणि ती नंतर कधीच कमी होऊ शकलं नाही.
सुकन्या आणि संजय यांचे लग्न सुरुळीत सुरू होते. घरातही आनंदाचे वातावरण होते. दोघेही आपल्या संसारवेलीवर फुल उमलण्याची वाट बघत होते. पण, एक दिवस अचानक त्यांचा मोठा अपघात झाला. या अपघातामुळे सुकन्या यांना पॅरालिसिस झाला आणि त्यांच्या शरीराचा उजवा भाग पूर्णपणे काम करणे थांबला होता. नृत्य हा सुकन्याचा श्वास होता. पण, अपघातानंतर त्यांना नृत्यापासून देखील दूर राहावे लागले होते. त्या महिनाभर बेडरेस्टवर होत्या. पॅरालिसिसमुळे त्यांना वजन वाढण्याचा त्रास झाला आणि यातच त्यांना थायरॉइडची समस्या देखील सुरू झाली. या आजाराने त्यांचे आयुष्य आणखीनच खडतर झाले होते. यामुळे त्यांचे वजन झपाट्याने वाढू लागले होते.
तरीही सुकन्या यांनी हार मानली नाही. इच्छाशक्तीच्या जोरावर त्या पुन्हा उभ्या राहिल्या. लग्नाला अनेक वर्षे उलटून देखील त्यांना मूल होत नव्हते. पण, तरी त्यांनी एक शेवटचा प्रयत्न करण्याचे ठरवले. डॉक्टरांनी त्यांना ‘मूल होऊ देऊ नकोस, कदाचित तुझ्या जीवालाही धोका होऊ शकतो’ असा इशारा दिला, तरी सुकन्या यांनी हा धोका पत्करला. सुकन्या यांच्या हट्टामुळे संजय आणि सासूबाई देखील त्यांच्यावर नाराज होते. पण सुकन्या आपली इच्छा पूर्ण करायला ठरली. शेवटी त्यांच्या इच्छेची पूर्तता झाली आणि जुलिया या गोड चिमुरडीचा जन्म झाला. डॉक्टरांनी त्यांना सीझर करण्याचा सल्ला दिला. डॉक्टरांनी सुकन्या यांना थायरॉइडच्या लेव्हलला नियंत्रित ठेवण्यासाठी मीठ न खाण्याचा सल्ला दिला होता. सुकन्या जवळपास सहा वर्षे बिनामिठाचे अळणी जेवण खात होत्या.
संबंधित बातम्या