मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  महेश मांजरेकर यांना कशी सुचली ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची कथा? काय म्हणाले अभिनेते वाचाच...

महेश मांजरेकर यांना कशी सुचली ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची कथा? काय म्हणाले अभिनेते वाचाच...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 25, 2024 02:49 PM IST

महेश मांजरेकर हे एक उत्तम अभिनेते असण्याबरोबरच उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक देखील आहेत. आता ‘जुनं फर्निचर’च्या निमित्ताने ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महेश मांजरेकर यांना कशी सुचली ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची कथा? काय म्हणाले अभिनेते वाचाच...
महेश मांजरेकर यांना कशी सुचली ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटाची कथा? काय म्हणाले अभिनेते वाचाच...

अभिनेते-दिग्दर्शक-लेखक असलेल्या महेश मांजरेकर यांचा ‘जुनं फर्निचर’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही तासांतच रिलीज होणाऱ्या या चित्रपटाविषयी प्रेक्षकांना भरपूर उत्सुकता आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, या चित्रपटातून काहीतरी एक वेगळं कथानक आपल्या भेटीला येणार असल्याचं प्रेक्षक म्हणताना दिसत आहेत. या निमित्ताने महेश मांजरेकर देखील वेगवेगळ्या मुलाखती देत असून, या मुलाखतीतून त्यांनी चित्रपटाविषयी भरभरून भाष्य केले आहे. ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटात महेश मांजरेकर स्वतः प्रमुख भूमिका साकारत असून, त्यांनीच या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन देखील सांभाळले आहे. या निमित्ताने एका आघाडीच्या वेबसाईटला मुलाखत देताना महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाच्या कथेविषयी एक उलगडा केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

महेश मांजरेकर हे एक उत्तम अभिनेते असण्याबरोबरच उत्कृष्ट लेखक आणि दिग्दर्शक देखील आहेत. आता ‘जुनं फर्निचर’च्या निमित्ताने ते पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा त्यांना कशी सुचली? असा प्रश्न विचारला असता महेश मांजरेकर म्हणाले की, ‘अगदी दहा-अकरा वर्षे झाली असतील, मला ही गोष्ट सुचली. म्हणजे ही गोष्ट तशी नवीन नाही, दहा-अकरा वर्षांपूर्वीचीच आहे. आणि मला एक सवय आहे की, गोष्ट सुचल्यानंतर माझ्या डोक्यात चित्रपटाच्या पटकथेच्या बांधणीस सुरुवात होते. एक कथा माझ्या डोक्यात पूर्णपणे तयार होते आणि त्यातून चित्रपट कसा दिसेल, या दृष्टिकोनातून पुढे विचारचक्र सुरू होतात. संपूर्ण चित्रपट माझ्या डोक्यात तयार झाल्याशिवाय मी तो कागदावर उतरवत नाही.’

अभिनेत्री तमन्ना भाटिया कायद्याच्या कचाट्यात अडकणार? पोलिसांनी पाठवले समन्स; नेमकं प्रकरण काय?

आपण आई-वडिलांना गृहीत धरतो का?

पुढे महेश मांजरेकर म्हणाले की, ‘माझी आई फार लवकर गेली. वडीलही खूप आधीच गेले होते. त्यामुळे आई वडील गेल्यावर काय वाटतं, हे मी जवळून अनुभवलं आहे. आई-वडील नसताना आपल्याला त्यांची जास्त आठवण येते. त्यांचं जास्त महत्त्व कळतं. ते असेपर्यंत त्यांचं असणं आपण खूप गृहीत धरलेलं असतं. मात्र, आई-वडील निघून गेल्यानंतर आपल्याला अनेक गोष्टी आठवतात आणि आपलं काय चुकलं याची देखील जाणीव होते. आपण आपला कितीसा वेळ आई-वडिलांबरोबर घालवला? आपण त्यांच्याशी काय गप्पा मारल्या? त्यांच्यासोबत कोणते क्षण घालवले?, असे सगळे विचार डोक्यात सुरू होतात आणि हळूहळू लक्षात यायला लागतं की, आपण बऱ्याच गोष्टींना मुकलो आहोत.’

काय दाखवायचंय या चित्रपटातून?

या चित्रपटाच्या कथेविषयी बोलताना महेश मांजरेकर पुढे म्हणाले की, ‘हा चित्रपट करताना मला आई-वडिलांचा छळ करणारा किंवा त्यांची संपत्ती विकणारा मुलगा दाखवायचा नव्हता. कारण मग कथानक खूपच रटाळवाणं झालं असतं. खऱ्या आयुष्यात असं करणारी मुलं फार कमी असतात. जास्तीत जास्त लोक म्हणतात की, आम्ही आमच्या आईवडिलांशी फार छान वागत आहोत. पण, खरंच आपण त्यांच्याशी चांगलं वागतो का? की आपण त्यांना केवळ गृहीत धरलेलं असतं? आई-वडील आहेत ते, तर त्यांना सगळ्याच गोष्टी कळतील, असं समजून आपण चालत असतो. अगदी चार एक दिवस फोन केला नाही, तर त्यांना समजेल की आपल्याला वेळ नाहीये. मात्र, आपण वेळ काढून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे हा चित्रपट करताना मला एखादा मुलगा किंवा सून कशी वाईट हे अजिबात दाखवायचं नव्हतं. पण, जे म्हणतात की आम्ही आमच्या आई-वडिलांची काळजी घेतो, खरंच ते ती काळजी घेतात का? याचीच एक गोष्ट मला चित्रपटातून दाखवायची होती. कारण या चित्रपटातला मुलगा हा मी आहे. हा चित्रपट करता करताना माझ्यासोबत जे घडले तेच मी लिहिले, त्यामुळे चित्रपटाचा ट्रेलरसुद्धा सगळ्यांनाच आपलासा वाटला. माझ्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी मी या चित्रपटात मांडल्या.’

IPL_Entry_Point