Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीचं ‘कोल्हापूर कनेक्शन’ काय? मावशीने दिले मराठीचे धडे-how actor manoj bajpayee learn marathi language from lady from kolhapur ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीचं ‘कोल्हापूर कनेक्शन’ काय? मावशीने दिले मराठीचे धडे

Manoj Bajpayee : मनोज वाजपेयीचं ‘कोल्हापूर कनेक्शन’ काय? मावशीने दिले मराठीचे धडे

HT Marathi Desk HT Marathi
Jan 23, 2024 07:00 PM IST

मुंबई हे खूप अवघड शहर आहे. या शहरात पाच वर्षं मी भरपूर संघर्ष केला. पुढे ‘सत्या’च्या भूमिकेने खऱ्या अर्थाने माझ्या करियरला चालना मिळाली, असं अभिनेता मनोज वाजपेयी यांनी पुण्यात सुरू असलेल्या 'पीफ' महोत्सवात सांगितलं.

Actor Manoj Bajpayee
Actor Manoj Bajpayee

प्रवीण गांगुर्डे, पुणे

पुण्यात सुरु असलेल्या ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’मध्ये (Pune International Film Festival) अभिनेता मनोज वायपेयी याने आपले सिनेमा सृष्टीतील अनुभव शेअर केले. महोत्सवात तो ‘विजय तेंडुलकर स्मृती’ व्याख्यानात ‘द क्राफ्ट ऑफ अॅक्टींग’ या विषयावर बोलत होता. करिअरमध्ये मोह अनेक येतात, पण अभिनय शिकण्यासाठी स्वतःला वेळ दिला पाहिजे, असा सल्ला मनोज वाजपेयीने अभिनय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला. महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी त्याच्याशी दिलखुलास संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे आणि ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर, समर नखाते उपस्थित होते.

मनोज वाजपेयी म्हणाला, 'अभिनय शिकण्यासाठी संयमाची फार आवश्यकता असते. आज संयम नसल्याचे दिसत आहे. एखादा अभिनयाचा कोर्स करतानाच तुम्हाला कोणी ओटीटी सिरिजसाठी बोलवतो, कोणी नाटक करायला बोलवतो. असे खूप मोह येतात. त्यामुळे तुमचे लक्ष विचलित होते. पण अभिनयाचे शिक्षण नीट घेतले पाहिजे. आजकाल शिकण्यासाठी कोणाला वेळ द्यायचा नाही. सगळ्यांना झटपट ५-६ दिवसांच्या कार्यशाळेमध्ये अभिनय शिकायचा आहे, अशी खंत मनोज वाजपेयी याने बोलून दाखवली.

‘अभिनय करणाऱ्या आणि विशेषतः नाटकात काम करणाऱ्यांनी एकतरी नृत्य प्रकार शिकला पाहिजे. मोठ्याने कविता वाचन केलं पाहिजे. लेखकाने खूप मेहनतीने संहिता लिहिलेली असते. संहितेवर तुम्ही काम केलं पाहिजे. एका अभिनेत्याला आपले शरीर, आवाज हे सगळं माहीत पाहीजे. अभिनेत्यांना स्वतःविषयी खुप प्रेम असता कामा नये. तुम्हाला दुसरे कोणी काही म्हणण्यापेक्षा, स्वतःच स्वतःचे टीकाकार व्हायला हवे.’ असं मनोज वाजपेयी म्हणाला.

बिहारच्या गावातून बॉलिवूड नगरीपर्यंत असा झाला प्रवास

मनोज वाजपेयी म्हणाला, ‘मी बिहारच्या एका छोट्या गावातून आलोय. मला शिकण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी शाळेमध्ये पाठवण्यात आले होते. तिथे एका कविता स्पर्धेसाठी माझी निवड झाली. मी पाचवीला असताना कविता म्हटली आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या. तिथेच मला मी आणि माझे स्वातंत्र्य सापडले. बिहारमध्ये नाटक करणाऱ्यांना भांड म्हटलं जातं. आम्ही अभिनेते नसिरुद्दीन शहा, राज बब्बर यांच्या करिअरच्या कहाण्या वाचत पुढे आलो. पुढे मी दिल्लीला आलो आणि थिएटर काय हे समजलं. मी दहा वर्षे थिएटर केलं. प्रत्येकवेळी नवा अनुभव यायचा. ‘अॅक्ट वन’ नावाचा आमचा ग्रुप होता. आम्ही थिएटर करत असताना पथनाट्य सुद्धा करायचो. प्रोसेनियम थिएटर करायचो. आवाजावर मेहनत घ्यायचो. दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालय‘ (National School of Drama) प्रवेशासाठी खूप कष्ट घेत होतो, तरी प्रवेश मिळत नव्हता. नंतर अभिनयाचे शिक्षक बॅरी जॉन यांनी माझी निवड केली. त्यांनी मला सगळं शिकवलं. आज मी जे काय आहे, ते सगळे त्यांच्यामुळेच. शाहरुख खान हा बॅरी जॉन यांचा अभिनेता होता, तेव्हा मी त्यांचा सहाय्यक म्हणून काम करत होतो.’ असं वाजपेयी म्हणाला.

अशी मिळाली करिअरला दिशा

एक दिवस दिग्दर्शक तिग्मांशू धूलिया माझ्याकडे आला आणि शेखर कपूर यांनी बोलावलं असल्याचा संदेश दिला. अशाप्रकारे ‘बॅंडिट क्वीन’मध्ये भूमिका मिळाली. पण त्या भूमिकेचा करियरसाठी फायदा झाला नाही. मुंबई हे अवघड शहर आहे. या शहरात पाच वर्षं भरपूर संघर्ष केला. पुढे ‘सत्या’च्या भूमिकेने खऱ्या अर्थाने माझ्या करियरला चालना मिळाली. मला माझी फिल्मोग्राफी तयार करायची होती म्हणून ‘भोसले’, ‘गली गुलिया’, ‘अलिगढ’ यासारखे चित्रपट केले. स्टारडम येते आणि जाते पण मी स्क्रिप्टकडे लक्ष देतो. नव्या कल्पना, नवे दिग्दर्शक यांना मी प्राधान्य देतो.' असं वाजपेयी याने सांगितलं.

अमेरिकेमध्ये 'नार्कोज’ बघून लक्षात आलं होतं की आता भारतामध्येही ओटीटी येणार आहे. परंतु वेगळं काही असेल तरच ओटीटीवर काम करायचं हे मी ठरवलं होतं. त्यानंतर ओटीटीसाठी ‘फॅमिली मॅन’ केला. त्यासाठी आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन डोळ्यासमोर ठेवला होता, असं मनोज वाजपेयी म्हणाला.

कोल्हापूरच्या मावशीकडून गिरवले मराठी भाषेचे धडे

‘सत्या’तील भूमिकेसाठी मराठी शिकण्याची गरज होती. आमच्याकडे कोल्हापूरच्या मावशी कामासाठी यायच्या. त्यांनी मला मराठी शिकवले. ‘अलिगढ’मधील भूमिकेसाठी माझ्या एका स्नेहीने मराठी साहित्याची ओळख करून दिली. मी २५ दिवस सतत मराठी भाषेचा अभ्यास केला आणि साहित्यामध्ये समरसून जाणारा प्राध्यापक अनुभवला. लहानपणापासून विजय तेंडुलकर यांची नाटके वाचत-बघत होतो. ‘घाशीराम कोतवाल’ आणि ‘सखाराम बाईंडर’ ही माझी आवडती नाटके आहेत. तेंडुलकर हे आजही काळाशी सुसंगत आहे. नव्या पिढीने त्यांना वाचलं पाहिजे' असं मनोज वायपेयी म्हणाला.

संबंधित बातम्या

विभाग