Laal Singh Chaddha Movie Failuer : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट २०२२मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात करीना कपूरही दिसली होती. हा आमिर खानचा कमबॅक चित्रपट होता आणि हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल याची त्याला खात्री होती. पण, रिलीजनंतर ‘लाल सिंह चड्ढा’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. अलीकडेच करीना कपूरने एका मुलाखतीत ‘लाल सिंह’ चड्ढाच्या बॉक्स ऑफिसवरील अपयशाचा आमिर खानवर किती परिणाम झाला हे सांगितले.
करीना कपूर खान हॉलिवूड रिपोर्टर इंडियाच्या गोलमेज चर्चेत सामील झाली. संभाषणादरम्यान, अभिनेत्रीने सांगितले की, तिचा सहकलाकार आमिर खानला चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस अपयशामुळे इतके वाईट वाटले की, त्याचे मन दुखावले गेले होते. करीना कपूरने आमिर खानचे कौतुक करत त्याला लिजेंड म्हटले आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आमिर भेटला, तेव्हा त्याने करीना कपूरची माफी मागितली होती, याचा किस्सा सांगितला. आमिर खान अभिनेत्रीला म्हणाला की, ‘आपला चित्रपट चालला नाही, तू माझ्याशी बोलशील ना?’ त्यावेळी मला आमिरचे दुःख समजले, असे करीना म्हणाली. याशिवाय करीना कपूरने ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातील तिच्या रुपा या व्यक्तिरेखेबद्दलही सांगितले. ती म्हणाला- 'मला वाटते की रूपाने माझ्यासाठी जे केले आहे, ते कदाचित पुन्हा सिंघमही करू शकणार नाही.'
अभिनेत्री पुढे म्हणाली की, चित्रपटाचे दिग्दर्शक अद्वैत चंदन यांनी तिचे पात्र ‘रूपा’ खूप सुंदर लिहिले होते. 'लाल सिंह चड्ढा व्यावसायिक ब्लॉकबस्टर चित्रपटांप्रमाणे बनविला गेला नाही, तर मनापासून बनवला गेला. ‘सर्वांनी खूप मेहनत केली होती आणि हा चित्रपट केवळ ५० कोटींचा व्यवसाय करेल, असे आम्हाला कधीच वाटले नव्हते. हा चित्रपट सत्य कथेवर आधारित होता’, असे करीना म्हणाली.
‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करीना कपूर दुसऱ्यांदा गरोदर होती. अभिनेत्रीने सांगितले की, तिला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिच्या प्रेगनन्सीची माहिती मिळाली होती. तिने आमिरला ही बातमी कळवली तोपर्यंत चित्रपटाचे अर्ध्याहून अधिक शूटिंग पूर्ण झाले होते. त्यावेळी आमिर खानने करीना कपूरला पाठिंबा दिला, ज्यामुळे ती खूप खूश झाली.
संबंधित बातम्या