Shah Rukh Khan-Honey Singh Clash : गायक-रॅपर हनी सिंह याचं नाव अनेकदा वादात अडकलं आहे. काही वर्षांपूर्वी हनीबाबत एक बातमी समोर आली होती की, एक टूरदरम्यान शाहरुख खानने हनीवर हात उचलला होता. इतकंच नाही तर, शाहरुख खानने हनी सिंहचं डोकं फोडल्याचं म्हटलं जात होतं. ही बातमी खूप व्हायरल झाली होती. मात्र, हनीने त्यावेळी हे वृत्त चुकीचे असल्याचं म्हटलं होतं. पण, तो या विषयावर सविस्तर कधीच बोलला नाही. आता हनी सिंहने आपल्या डॉक्युमेंटरी सीरिजमध्ये तेव्हा नेमकं काय घडलेलं, याचा संपूर्ण प्रकार सांगितला.
हनी सिंह आपल्या डॉक्युमेंटरीमध्ये म्हणाला की, ‘आता ९ वर्षांनंतर मी तुम्हाला सांगणार आहे की, त्या दिवशी नेमकं काय झालेलं…’. हनी सिंह म्हणाला की, त्याला यूएस टूरसाठी परफॉर्म करायचे नव्हते. पण, त्याच्या टीमने जबरदस्तीने त्याला स्टेजवर पाठवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्याने स्वतः कप त्याच्या डोक्यावर मारून घेतला होता.
हनी म्हणाला की, ‘शाहरुख खानने माझ्यावर हात उचलल्याची अफवा कोणीतरी पसरवली होती. तो माणूस माझ्यावर खूप प्रेम करतो. तो कधीच माझ्यावर हात उचलू शकत नाही. जेव्हा ते लोक मला शिकागोमध्ये एका कार्यक्रमासाठी घेऊन गेले होते, तेव्हा मी म्हणालो की, मला इथे परफॉर्म करायचे नाही. मला वाटलं की, जर मी परफॉर्म केलं तर, मी त्या शोमध्ये मरून जाईन. पण, कुणीही माझं ऐकलं नाही. सगळ्यांनी मला तयार राहायला सांगितलं, पण मी नकार देत राहिलो. मग, मी वॉशरूममध्ये जाऊन स्वतःचं टक्कल करून घेतलं. तर, त्यांनी मला टोपी घालून परफॉर्म करायला सांगितलं. त्यावेळी मला खूप राग आला आणि तेव्हा माझ्या हातात एक कॉफी मग होता, तो मीच स्वतःच्या डोक्यावर मारून घेतला.’
या डॉक्युमेंटरीमध्ये हनीची बहीणही होती. तिने हा किस्सा सांगताना म्हटले की, ‘त्यावेळी मी माझ्या रूममध्ये होते. हनीने मला मेसेज केला की, माझ्यासोबत काहीतरी गडबड घडत आहे. त्यावर मी म्हणाले, की मी स्काइपवर येऊ शकते आता.. जेव्हा मी त्याच्याशी बोलू लागले तेव्हा, हनी म्हणाला प्लीज मला वाचव, गुडिया प्लीज मला वाचव. यानंतर त्यांचा संपर्क तुटला. त्यानंतर मी शालिनीशी (हनी सिंहची माजी पत्नी) संपर्क साधण्याचा प्रयत्न करत राहिले. ती म्हणाली की, हनीला हा शो करावा लागणार आहे. तू त्याला तयार कर. पण, मी म्हणाले की, मी हे असं काही करू शकत नाही. हनीने मला सांगितले की, त्याला बरे वाटत नाहीय आणि काहीतरी गडबड होत आहे. तीन तास माझा त्याच्याशी संपर्क होत नव्हता. तीन तासांनंतर मला कळले की, हनीच्या डोक्याला दुखापत झाली आहे आणि तो रुग्णालयात आहे.’
हनीच्या डॉक्युमेंटरीबद्दल बोलायचे झाले तर, या सीरिजचे नाव ‘यो यो हनी सिंह : फेमस’ असे आहे, ज्याचे दिग्दर्शन मोझेज सिंहने केले आहे. यात हनी सिंहचे पर्सनल आणि प्रोफेशनल न पाहिलेले क्षण पाहायला मिळाले आहेत. ही सीरिज नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंग होत आहे.
संबंधित बातम्या