सध्या ओटीटीवर प्रदर्शित होणारे सिनेमे आणि वेब सीरिज यांना जास्त मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. घर बसल्या, आपल्या सोयीनुसार चित्रपट पाहणे प्रेक्षकांना जास्त आवडत असल्याचे दिसत आहे. नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, डिस्नेप्लस हॉटस्टार, झी ५ अशा अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर नवनवीन कंटेन्ट प्रदर्शित होत असल्याचे दिसत आहे. आता या आठवड्यामध्ये कोणता कंटेन्ट प्रदर्शित होणार चला जाणून घेऊया...
रिचा चड्ढा आणि अली फजल निर्मित 'गर्ल्स विल बी गर्ल्स' या आठवड्यात ओटीटी पडद्यावर झळकणार आहे. हा चित्रपट 18 डिसेंबरपासून अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर स्ट्रीम होणार आहे. या चित्रपटात प्रीती पाणिग्रही, केशव बिनॉय किरण आणि कानी कुश्रुती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला वर्ल्ड सिनेमा ड्रामॅटिक कॅटेगरीत ऑडियंस अवॉर्ड आणि स्पेशल ज्युरी अवॉर्ड मिळाला. याशिवाय लॉस एंजेलिस येथे झालेल्या भारतीय चित्रपट महोत्सवात ग्रँड ज्युरी पुरस्कार, जकार्ता आंतरराष्ट्रीय महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपट, बियारित्झ फिल्म फेस्टिव्हलमधील ट्रान्सिल्व्हेनिया करंडक आणि एमएएममध्ये चार पुरस्कार देण्यात आले.
पंजाबी गाण्यांना मस्त गाण्याचा टॅग देणारा गायक हनी सिंगच्या जीवनावर आधारित डॉक्यूमेंट्री प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या डॉक्यूमेंट्रीचे नाव 'यो यो हनी सिंग फेमस' असे आहे. ही डॉक्यूमेंट्री २० डिसेंबर २०२४ रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या डॉक्युमेंटरीमध्ये हनी सिंगच्या आयुष्यातील चढ-उतार चांगल्या प्रकारे दाखविण्यात येणार आहेत. त्यामुळे सर्वजण या सीरिजची आतुरतेने वाट पाहात आहे.
हनी सिंग हा बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट पंजाबी गाणी गाणारा गायक आहे. पण प्रसिद्धी आणि पैसा या सगळ्यामुळे हनीच्या खासगी आयुष्यात मोठे वादळ आले होते. त्याला ड्रग्ज आणि इतर अंमली पदार्थांची सवय लागली होती. त्यासाठी त्याला रिहॅब सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. दरम्यान, त्याचा घटस्फोटही झाला. अशा हनी सिंगच्या आयुष्यातील अनेक गोष्टी या डॉक्यूमेंट्रीमध्ये दाखवण्यात येणार आहेत.
वाचा: माहिती आहे का राज कपूर यांनी केले आहे 'या' मराठी सिनेमामध्ये काम, अशोक सराफ होते मुख्य भूमिकेत
तेलुगु अभिनेता सत्य देवचा क्राइम ड्रामा चित्रपट 'झेब्रा' काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता हा सिनेमा लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म एएचएवर २० डिसेंबररोजी प्रदर्शित होणार आहे.