Home Minister Show Kissa: ‘दर उघड बये दर उघड...’ म्हणत प्रत्येक घरातील गृहिणीचा सन्मान करणारे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर आता महाराष्ट्रातच नाही, तर जगभरात लोकप्रिय झाले आहेत. गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर यांनी प्रत्येक घरातील गृहलक्ष्मीचा सन्मान केला. अगदी प्रत्येक घरात जाऊन, आदेश बांदेकर त्या कुटुंबाचा कायस्वरूपी भाग बनले. तर, वहिनींना पैठणी देऊन आदेश बांदेकर यांनी घराघरात आनंद वाटला. या कार्यक्रमात पैठणी देण्याची सुरुवात होण्यामागे आदेश बांदेकर यांच्या पत्नी सुचित्रा बांदेकर यांची कल्पना होती. यामागे देखील एक रंजक किस्सा आहे.
‘पैठणी’ ही केवळ साडी नसून, प्रत्येक स्त्रीसाठी एक खास दागिना आहे. महिलावर्गात पैठणीची एक वेगळीच क्रेझ आहे. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमात पैठणी देण्याची कल्पना आदेश बांदेकर यांना सुचित्रा बांदेकर यांच्याकडून मिळाली होती. याचा किस्सा नुकताच सुचित्रा बांदेकर यांनी एका मुलाखतीत शेअर केला आहे. यावेळी बोलताना सुचित्रा बांदेकर म्हणाल्या की, ‘होम मिनिस्टरला आता २० वर्ष उलटून गेली आहेत. हा किस्सा शो सुरू होण्याआधीचा आहे. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात हातात फारसे पैसे नसायचे. पण त्या काळातही पैठणीची क्रेझ एखाद्या दागिन्यासारखी होती.’
पुढे सुचित्रा बांदेकर म्हणाल्या की, ‘त्यावेळी आमच्या सोसायटीतील सगळ्या महिला वर्गाने पैठणी विकत घ्यायची ठरवली होती. आता त्यावेळी पैठणी आम्हा सगळ्यांसाठीच महाग असायची. मग यावर आम्ही एक शक्कल लढवली, ती अशी की, आम्ही दर महिन्याला काही पैसे जमा करायचो आणि सगळ्याजणी जमून चिठ्ठी काढायचो. त्या चिठ्ठीत जिचे नाव निघायचे, तिला या पैशातून एक पैठणी घेऊन दिली जायची. अर्थात ही आमची पैठणी भिशी होती. आम्ही दर महिना ही पैठणी भिशी खेळायचो. हीच गोष्टी मी आदेशला सांगितली होती.’
सुचित्रा बांदेकर यांच्याकडून ही गोष्ट ऐकताच आदेश बांदेकर यांना आश्चर्य वाटलं. ‘पैठणी’ ही स्त्रियांसाठी इतकी महत्त्वाची असते, हे कळल्यावर त्यांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी वाहिनीच्या अधिकाऱ्यांना फोन करून त्याबाबत कळवलं. १० ते १५ हजारांची ही पैठणी स्वतःसाठी विकत घेण्यासाठी हजारदा विचार करण्याऱ्या गृहलक्ष्मीला त्यांनी भेट म्हणून ही साडी देऊन सगळ्यांची मनं जिंकून घेतली. मात्र, या सगळ्या कल्पनेच श्रेय आदेश बांदेकर आजही आपल्या पत्नीला म्हणजेच सुचित्रा बांदेकर यांना देतात.
संबंधित बातम्या